साहेबांचे पाय पाहूनच त्यांना पसंत केलं…कांचनजीजींची तुफान फटकेबाजी; बाळासाहेब थोरात क्लिन बोल्ड
काँग्रेस नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. अमोल कोल्हे यांची भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच आयोजन देखील वाढदिवसानिमित्त संगमनेर शहरात करण्यात आलं. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रात्री झालेल्या वाढदिवसाच्या सोहळ्यात थोरात आणि तांबे कुटुंबीयांबरोबर पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मनोज गुडेकर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, नगर | 7 फेब्रुवारी 2024 : अनेक राजकारण्यांच्या गृहलक्ष्मी राजकारणात आघाडीवर आहेत. तर काहींच्या गृहलक्ष्मी राजकारणात अजिबात सक्रिय नाहीत. कोणत्याही राजकीय विषयांवर त्या कधीच बोलत नसतात. आपली मुलं आणि संसार एवढंच त्यांचं आयुष्य असतं. त्या कधी प्रकाशझोतातही नसतात. पण जेव्हा कधी एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त म्हणा संधी मिळाल्यास त्या भरभरून बोलतात. असं काही बोलून जातात की राजकारण्यांनाही बोलता येत नाही. तळमळीने बोलताना तुफान फटकेबाजीही करतात. जीजी अर्थात कांचन थोरात यांनी पती माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची अशीच विकेट काढलीय. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात नवऱ्याविषयी भरभरून बोलताना जीजी अशा काही बोलल्या की थोरात क्लिन बोल्ड झाले. जीजींच्या भाषणांवर टाळ्यांचा सारखा पाऊस पडत होता अन् आबा म्हणजे बाळासाहेब थोरात गालातल्या गालात मिश्किल हसून दाद देत होते. हा सोहळा अत्यंत देखणा आणि दृष्ट लागावा असा झाला होता.
राज्याचे माजी महसूलमंत्री आबा ऊर्फ बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. आबांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहरात एका सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. थोरात पती-पत्नींनी केलेल्या भाषणामुळे सोहळ्याची रंगत अजूनच वाढली. यावेळी थोरात यांच्या पत्नी कांचन ( जीजी ) थोरात यांच्या भाषणाने सर्वांची दाद मिळवली. साहेब आता 70 वर्षांचे होताय.. मी त्यांच्या पेक्षा 7 वर्षांनी लहान. साहेब जेव्हा मला पाहायला आले तेव्हा मी त्यांचे पाय पाहूनच त्यांना पसंत केले. त्यांनी माझा चेहरा पाहिला असेल मात्र मी फक्त पायच पाहू शकले.. आमचा योगायोग होता म्हणून लग्न जमलं.. लग्नानंतर वीस वर्ष कधी पिक्चर आणि नाटकाला सुद्धा नेल नाही. रोज फक्त पावणेरावळे हेच करत आले. साहेबांनी मला अमेरिका, दुबई खूप फिरवलं. मात्र ते 30 वर्षानंतर. साहेबांना वेळच नव्हता. रोज राजकारण. घरात आले की चेहरा पडलेला दिसायचा. मात्र कार्यकर्ते आले की लगेच जायचे आणि दीड दोन तास बोलत बसायचे. फक्त आपल्या समोर आले की मी थकलोय, झोप येते हे सुरू व्हायचं. मी जे बोलतेय ते मनातलं. पाठांतर केलेले नाही. मला कुटुंबाने खूप साथ दिली. नंतर मी मैत्रिणीचा ग्रुप बनवला. त्यांनी खूप साथ दिली. त्यामुळे आता काय मलाही साहेबांची आठवण येत नाही, असं कांचन जीजींनी थोरात यांनी म्हणताच एकच हशा पिकला.
येथे पाहा व्हिडीओ –
माझा निर्णय बिनचूक ठरला
त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनीही धुवांधार बॅटिंग केली. माझं राजकरण काम सगळ्यांना माहीत आहे. मात्र सौभाग्यवती कांचनने अनेक किस्से सांगितले. मी आधी जोर्वे गावात राहायचो. वडील आमदार असताना मी वकील झालो. त्यावेळी लग्नाचा विषय आला. मी विचार केला की आपल्याकडे रोजच इतके पाहुणे कार्यकर्ते येतात, इथ टिकेल कोण? हाच माझा तेव्हा प्रश्न होता. मी महाविद्यालयात असताना मला तिथेच पाहुणे पाहायला आले. एका व्यापाऱ्याने त्यावेळी सांगितलं की, चांगला मुलगा आहे. वकील आहे. गोरा गोमटा आहे. मी कांचनला पाहायला गेलो. तिथे त्यांचं घर आणि मोठं कुटुंब होतं. त्यांचं कुटुंब पाहूनच ठरवलं हे आपल्याकडे बरोबर जमेल. कोण चालेल आपल्या घरी ही दूरदृष्टी आणि अचूक निर्णय माझा ठरला. त्यामुळे कटकट नावाचा प्रकार आजपर्यंत नाही. तुमचं तुम्हाला माहीत आहे. अनेकांच्या घरात रोज सुरूच असतं. नवरा बिचारा काम करून येतो आणि घरी आला का बायको म्हणते आले का फिरून? तो दमून आलेला असतो आणि असा प्रश्न येतो जसा तो बागेत फिरायला गेलेला असतो. असा काही त्रास मला झाला नाही. माझा निर्णय बिनचूक ठरला हे आज कळतं, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हणताच सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली.