Happy Birthday Rashmi Thackeray | ‘मातोश्री’च्या सूनबाई ते मिसेस मुख्यमंत्री, रश्मी ठाकरेंचा प्रवास

| Updated on: Sep 23, 2020 | 1:05 PM

रश्मी ठाकरे यांची नेहमीच शिवसेनेच्या राजकीय भूमिका ठरवण्यामागे पडद्याआड महत्वाची भूमिका राहिल्याची शिवसेनेत आणि राजकारणात दबक्या आवाजात चर्चा होत असते.

Happy Birthday Rashmi Thackeray | मातोश्रीच्या सूनबाई ते मिसेस मुख्यमंत्री, रश्मी ठाकरेंचा प्रवास
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या मिसेस मुख्यमंत्री अर्थात रश्मी ठाकरे यांचा आज (23 सप्टेंबर) वाढदिवस. राजकीय कुटुंबातील सूनबाई असूनही प्रत्यक्ष राजकारणापासून अलिप्त राहणाऱ्या ‘रश्मी वहिनी’ अशी गेल्या काही वर्षात महाराष्ट्राला त्यांची ओळख. शिवसेनाप्रमुखांच्या सूनबाई असलेल्या रश्मी ठाकरे गेल्या वर्षभरात मात्र मुख्यमंत्र्यांची पत्नी, ‘सामना’च्या संपादक, पर्यावरण मंत्री आणि वन्यजीव अभ्यासकाच्या ‘मातोश्री’ अशी नवी बिरुदावली मिरवताना दिसत आहेत. (Mrs Chief Minister Rashmi Thackeray Birthday Special)

रश्मी ठाकरे या माहेरच्या रश्मी पाटणकर. त्यांचे वडील माधव पाटणकर यांचा डोंबिवलीत व्यवसाय होता. मुलुंडच्या वझे-केळकर महाविद्यालयातून त्यांनी बीकॉमपर्यंत शिक्षण घेतले. राज ठाकरे यांची भगिनी जयवंती या रश्मी यांची मैत्रीण. त्यातूनच उद्धव ठाकरे यांच्याशी ओळख झाली आणि 1989 मध्ये पाटणकरांची लेक ठाकरेंची सून झाली.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची मार्च महिन्यात निवड करण्यात आली. रश्मी ठाकरे यांच्या नियुक्तीसह त्यांना ‘सामना’च्या पहिल्या महिला संपादक होण्याचा सन्मान मिळाला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी ‘सामना’ दैनिकाचं संपादकपद सोडलं होतं. त्यानंतर ही जबाबदारी कुणाकडे दिली जाणार याविषयी बरीच उत्सुकता होती. रश्मी ठाकरे यांच्या निवडीनंतर या पदावर ठाकरे कुटुंबातीलच व्यक्ती असणार हे स्पष्ट झालं.

रश्मी ठाकरे यांच्या स्वभावातील साधेपणाचं कौतुक अनेक राजकीय नेत्यांपासून शिवसैनिक करताना दिसतात. मुख्यमंत्री पती, पर्यावरण मंत्री मुलगा यांच्या जोडीने वन्यजीव अभ्यासाच्या क्षेत्राची वेगळी वाट चोखंदळणाऱ्या दुसऱ्या मुलासह शिवसेनेच्या परिवाराला त्यांनी जोडून ठेवलं आहे.

रश्मी ठाकरे यांच्याकडे कोणकोणत्या जबाबदारी ?

  • दैनिक सामनाच्या संपादक
  • शिवसेनेच्या संलग्न संघटनाच्या अध्यक्ष
  • मातोश्री महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष
  • मातोश्री महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्ष

रश्मी ठाकरे या सक्रीय राजकारणात थेट सहभागी नसल्या तरी त्या शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये नेहमीच सहभागी होत आल्या आहेत. अनेकदा शिवसेनेच्या मंचावरही त्या दिसल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना लाभाचं पद म्हणून सामना संपादकपद सोडावं लागलं. आदित्य ठाकरे यांचीही कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्याने तेही सामनाचे संपादकपद घेऊ शकत नव्हते. तेजस ठाकरे यांचे वय लहान आहे, त्यांना अजून तितकासा अनुभव नाही. त्यामुळे ठाकरे घराण्यातील व्यक्तीकडेच हे पद असावे, असा विचार करुन रश्मी ठाकरे यांची या पदावर नियुक्ती झाली. (Mrs Chief Minister Rashmi Thackeray Birthday Special)

शिवसेनेची राजकीय भूमिका ठरवण्यामागे रश्मी ठाकरे यांची पडद्याआड महत्वाची भूमिका राहिल्याची राजकारणात दबक्या आवाजात चर्चा होत असते. शिवसेना-भाजप युतीचं घोंगडं भिजत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला एक किस्सा चांगलाच गाजतो. ‘मातोश्री’वर आम्ही गेलो, रश्मी वहिनींच्या हातची साबुदाणा खिचडी आणि वडे खाल्ले आणि युतीचा निर्णय झाला, असे त्यांनी हसत-हसत सांगितले होते. त्यामुळे रश्मी ठाकरे यांना पडद्याआड राहून काम करणं पसंत असल्याचं दिसतं.

रश्मी ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त टीव्ही9 मराठीकडून शुभेच्छा!

संबंधित बातम्या :

रश्मी ठाकरे दैनिक सामनाच्या संपादक, सामनाच्या पहिल्या महिला संपादक

(Mrs Chief Minister Rashmi Thackeray Birthday Special)