Article 370 : अब्दुल्ला आणि मुफ्ती यांना विश्वासात घ्यायला हवं होतं : शरद पवार
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला किंवा पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना सांगूनही यापूर्वी निर्णय घेण्यात आले होते. या सगळ्यांनी तो भाग भारतात राहायला पाहिजे अशी भूमिका घेतली होती. त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं, असंही शरद पवार (Sharad Pawar article 370) म्हणाले.
मुंबई : जम्मू काश्मीरमधील कलम 370 काढण्यापूर्वी तेथील स्थानिक नेत्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar article 370) यांनी व्यक्त केलंय. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला किंवा पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना सांगूनही यापूर्वी निर्णय घेण्यात आले होते. या सगळ्यांनी तो भाग भारतात राहायला पाहिजे अशी भूमिका घेतली होती. त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं, असंही शरद पवार (Sharad Pawar article 370) म्हणाले.
कलम 370 काढण्यापूर्वी काश्मीर खोऱ्यातील लोकांना विश्वासात घेणं महत्त्वाचं असल्याचं शरद पवार यांचं म्हणणं आहे. फक्त जम्मू काश्मीर नाही, तर ईशान्य भारतातही बाहेरच्या व्यक्तीला जमीन खरेदी करता येत नाही. अगदी महाराष्ट्रातही शेतकरी नसलेल्यांना कृषी जमीन खरेदी करता येत नाही ही वस्तूस्थिती आहे. तिकडे लोकं आनंद व्यक्त करत असल्याचं सांगितलं जातंय, ते आम्हाला पाहू तर द्या, तिकडे 40 हजार सैन्य पाठवलं, इंटरनेट बंद केलं मग ते कसं दिसणार? असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, संसदीय कामकाजामध्ये शरद पवार उपस्थित नव्हते. त्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं. तोंडाचं ऑपरेशन असल्यामुळे मी संसदेत जाऊ शकलो नाही. पण माझे सहकारी उपस्थित होते. मी न गेल्याने फार फरक पडत नाही, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका
राज्यात एका भागात दुष्काळ आहे, दुसरीकडे पूरस्थिती आहे आणि त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरु आहे. याबाबत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. कोणीही राज्यकर्ता असो, या संकटग्रस्त लोकांना बाहेर काढण्याची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री त्यांच्या राजकीय कामात गुंतले आहेत. पण उशिरा का होईना ते काम करत आहेत हे चांगलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
13 जिल्ह्यात अजूनही टँकर्सने पिण्याचे पाणी पोहोचवलं जातंय. काही ठिकाणचे पाण्याचे टँकर्स कमी केलेत ती लोकं मला भेटून गेले. एकीकडे पूरस्थिती, तर दुसरीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य हा मोठा विरोधाभास आहे. यावर उपाययोजना करण्याचं शहाणपण सरकारला सूचेल अशी अपेक्षा करूयात, असंही शरद पवार म्हणाले.
यात्रेचा निर्णय घेताना अशी परिस्थती निर्माण होईल असं त्यांना माहिती नव्हतं. पण मुख्यमंत्री हे राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख आहेत. त्यांनी लक्ष घातलं असतं तर लोकांची आधीच सुटका झाली असती, असंही ते म्हणाले.