Mulayam Singh Yadav: ‘पैलवान’ ते यूपीचे मुख्यमंत्री, जाणून घ्या नेताजींची कारकीर्द
मुलायम सिंह यादव यांचं निधन झालंय. त्याच्या करिअरवर एक नजर टाकूया...
मुंबई : मुलायम सिंह यादव अर्थात नेताजी… उत्तर प्रदेशच्या राजकारणातील महत्वाचा नेता… सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलायम सिंह (Mulayam Singh Yadav Passes Away) यांनी कधीकाळी पैलवान होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. तेच नेताजी (Mulayam Singh Yadav) आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि पुढे जाऊन देशाचे संरक्षण मंत्री झाले. यूपीसह देशाच्या राजकारणातही त्यांचं स्थान अढळ राहिलं. त्याचं करिअर जाणून घेऊयात…
1939 ला उत्तर प्रदेशमधल्या इटावा जिल्ह्यातील सैफई या गावात मुलायम सिंह यांचा जन्म झाला. त्याचे वडील सुघर सिंह आणि आई मारुतीदेवी हे दोघेही शेती करायचे.
सुघर सिंह यांची इच्छा होती की मुलायम सिंह यांनी पैलवान व्हावं. त्यासाठी त्यांना तसं प्रशिक्षणही देण्यात आलं. स्वत: मुलायम सिंह यांनाही कुस्तीची आवड होती. कुस्तीत आपल्या डावपेचामुळे प्रतिस्पर्ध्याला चितपट करायचे. याच डावपेचाचा त्यांनी राजकारणातही उपयोग केला आणि तीनदा उत्तरप्रदेशचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं.
राम मनोहर लोहिया यांनी नहर रेट आंदोलनाची घोषणा केली. यात मुलायम सिंहही सहभागी झाले. या आंदोलना दरम्यान लोहिया यांच्यासरह काही नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. यात मुलायम सिंहदेखील होते. यावेळी त्यांचं वय अवघं 15 वर्षे होतं. तेव्हापासून लोहिया आणि त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. तिथून पुढे ते कायम राहिले.
मुलायम सिंह आठवेळा आमदार म्हणून निवडून आले. 1989 ला मुलायम सिंह पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. 1993 ला ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. तर 2003 ला तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.
1995 ला ते देशाचे संरक्षण मंत्री झाले. उत्तर प्रदेशच्या राजकारणात मुलायम सिंह यादव यांच्या नावाला वेगळं वलय आहे. आज त्यांच्या जाण्याने अवघं उत्तर प्रदेश हळहळलं आहे.