भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणाचं गटार केलंय; ठाकरे गटाच्या नेत्याचा घणाघात
Maharashtra Political Crisis : पहाटे-दुपारी लोक झोपत असताना शपथ अजितदादा शपथ घेतात; ठाकरे गटाच्या नेत्याचा अजित पवारांना टोला तर भाजपवर टीकास्त्र
मुंबई : अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावरून शिवसेवेच्या ठाकरे गटाने भाजपवर टीकास्त्र डागलंय. भाजपने राज्यातील राजकारणाचं गटार केलं आहे. अतिशय खालच्या स्तरावर जाऊन हे राजकारण सुरु आहे. अजितदादांची मनाची तयारी होती. म्हणून त्यांना कोणी रोखलं नाही,असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
राज्यपाल रमेश बैस यांची भूमिका भगतसिंह कोश्यारी यांच्या पुढची आहे की काय अशा प्रकारची स्थिती आहे. राष्ट्रवादी जे आमदार फुटले त्यांनी कळवले की नाही हे माहीत नाही. पण या शपथविधीमुळे महाविकास आघाडी अधिक मजबूत होईल, असं दानवे म्हणालेत.
गेली अनेक वर्षे शिवसैनिक गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी येतो. आज आम्ही अभिवादन केलं, असं दानवे म्हणालेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावर कोण कसं वेगळे झालं हे महाराष्ट्र्राला माहीत आहे. ज्या गोष्ठी शक्य नाही त्यावर बोलणं योग्य नाही. महाविकास आघाडीची दहशत आहे. म्हणूनच ही महाविकास आघाडी फोडण्याचं काम केलं जात आहे. सध्या आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत आणि आमची आघाडी मजबूत आहे, असं अंबादास दानवे म्हणालेत.
अजित पवार सकाळी दुपारी लोक झोपलेले असताना शपथ घेतात. भाजपने देशातील, महाराष्ट्रातील राजकारण नासवलं आहे. पार्टी विथ डिफ्रान्स म्हणणारी पार्टी सत्तेसाठी काहीही करायला लागली आहे, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी टीकास्त्र डागलं आहे.
काहीही फरक पडणार नाही. देशाच्या पंतप्रधानांनी नाव घेऊन राष्ट्रवादीवर टीका केली. आज त्याच लोकांना सोबत घेतलं आहे.अजित पवार यांना भाजपने सोबत घेतलं आहे. आम्ही आमची कातडी वाचवण्यासाठी जातो. नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसतो, अशी या लोकांची भूमिका आहे, असं म्हणत अरविंद सावंत यांनीही टीका केली आहे.
अजित पवार यांना गद्दार म्हणायचं की नाही तो त्या पक्षाचा प्रश्न आहे. आमचा मराठी भाषेतला शब्द गद्दारी आहे.तो आम्ही शिंदे गटासाठी वापरतो कारण त्यांनी गद्दारीच केली आहे, असं सावंत म्हणालेत.