मुंबई | 27 जुलै 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच भाजपच्या नेत्यांनी मात्र वाढदिवसाच्या दिवशीच टीकेचं अस्त्र बाहेर काढलं आहे. भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपचे नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे हे गांधी ची स्तुती करतात म्हणजे लाचारी करत आहेत. उद्धव ठाकरे काम टाळणारे आणि घरी बसलेले मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ते घराबाहेर पडले नाहीत. ङरात राहूनच त्यांनी काम केलं. बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी सोडलं आहे, असा घणाघात
अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
‘आवाज कुणाचा’ या मुलाखत सत्रात उद्धव ठाकरे यांची आज मुलाखत प्रसिध्द झाली. या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीवर भाष्य केलंय. यांच्यात हिंमत नाही म्हणून हे लोक निवडणुका घेत नाहीत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला अतुल भातखळकर यांनी उत्तर दिलं आहे. निवडणुका उद्या घ्या… तुम्ही कोर्टात दाखल केलेली पिटीशन परत का घेत नाहीत? तुमच्यामुळेच निवडणुका रखडल्या आहे, असं भातखळकर म्हणाले आहेत.
तसंच उद्धव ठाकरे यांना मानसोपचारतज्ज्ञांची गरज आहे, असंही अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी ही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाचा शुभेच्छा दिल्या आहे. सोबतच प्रसाद लाड यांनी टीकाही केली आहे.
उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा… त्यांनी हिंदुत्वाशी तडजोड केली आणि आज ही अवस्था झाली आहे. मी त्यांना हा शब्दकोश भेट देणार आणि यातून त्यांना समजेल की शब्द कोणते वापरायचे… कसं बोलायचं…, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
‘आवाज कुणाचा’मधील उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रसाद लाड यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची मुलाखत बोगस आहे. ही मुलाखत घेणारा वेडा आहे आणि मुलाखत देणाराही वेडा आहे. त्या मुलाखतीला काहीही अर्थ नाहीये, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
आम्ही कुणाला घाबरत नाही. कुणाला घाबरण्याचं कारण नाही. उद्धव ठाकरे स्वत:च घाबरून घरी बसले आहेत. आमचे राम आमच्याकडेच आहे तुमचे राम दिल्लीत अशी ठाकरेंची अवस्था आहे. जितेंद्र आव्हाड काही बोलले तरी 17 आमदारांमध्ये त्यांचं ही नावं आहे. लवकरच ते सुद्धा आमच्याकडेच दिसतील. उद्धव ठाकरे यांना उपचारांची गरज आहे, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.