आदिती तटकरे यांच्याबद्दल बोलताना भरत गोगावले यांची जीभ घसरली; म्हणाले, महिला-पुरुषात काही फरक…

| Updated on: Jul 12, 2023 | 3:03 PM

Bharat Gogawale on Aditi Tatkare : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच; आदिती तटकरे यांच्याबद्दल बोलताना भरत गोगावले यांची जीभ घसरली

आदिती तटकरे यांच्याबद्दल बोलताना भरत गोगावले यांची जीभ घसरली; म्हणाले, महिला-पुरुषात काही फरक...
Follow us on

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. यात शिवसेना आणि भाजपतील नेत्यांना संधी मिळणार आहे. शिवसेनेतील काही नेत्यांनी मंत्रिपदावर दावा केला आहे. त्यातीलच एक नेते म्हणजे भरत गोगावले. त्यांनीही मंत्रिपदावर दावा केला आहे. शिवाय रायगडचं पालकमंत्रिपद आपल्याकडेच येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र हा दावा करताना गोगावले यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय.

पालकमंत्रिपदावर दावा करताना भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांचा उल्लेख केला. पण तो दावा करत असताना गोगावलेंची जीभ घसरली आहे.

आदिती तटकरे यांनी पालकमंत्री म्हणून चांगलं काम केलं असलं तरी मी त्याच्यापेक्षा मी चांगलं काम करून दाखवेन. शेवटी महिला आणि पुरुषात काही फरक आहे की नाही?, असं अजब वक्तव्य गोगावले यांनी केलं आहे.

भरत गोगावले यांच्या वक्तव्याची महाराष्ट्रभर चर्चा होतेय. शिवाय संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

ठाकरेगटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या वक्तव्याचा निषेध केला आहे. भरत गोगावले यांनी महिला पुरुष असा फरक करु नये, असं त्या म्हणाल्यात.

भरत गोगावलेंचाही त्याग आहे. त्यांच्या विषयी मला सहानुभूती आहे, असा उपरोधिक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

शिंदे सरकारमधील पहिल्या महिला मंत्री

शिंदे सरकार सत्तेत आलं. तेव्हापासूनच या मंत्रिमंडळात महिला मंत्री नसल्याचा आरोप विरोधक करत होते. पण अजित पवार यांनी बंड केलं तेव्हा झालेल्या शपथविधीत आदिती तटकरे यांचा समावेश होता. त्यामुळे या युती सरकारमधील त्या पहिल्या महिला मंत्री आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारावर गोगावले काय म्हणाले?

मंत्रिमंडळ विस्तार होणारच आहे आम्ही आता वेटिंगला आहोत. अजितदादा गटसोबत आला. म्हणून थोडा उशीर झाला आहे. आता फक्त फोन यायची वाट पाहतोय आम्ही तयार आहोत, असं गोगावले म्हणालेत.

मंत्रीपदाबरोबरच रायगडचे पालकमंत्रीपदही मलाच मिळणार आहे आणि त्यासाठी मी शेवटपर्यंत आग्रही राहील, असंही ते म्हणालेत.

संजय राऊत काहीही बोलतात ते ज्योतिष आहेत त्यांना सगळं दिसत त्यांना बोलूद्यात. मंत्रिमंडळ विस्तार होणारच आहे त्यात काही वाद नाही, असा टोला गोगावले यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून सध्या रस्सीखेच पाहायला मिळतेय. अजित पवार गटातील आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात आदिती तटकरेही होत्या. त्यामुळे आदिती यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रिपद जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेचे आमदार भरत गोगावले हे देखील या पालकमंत्रिपदावर आला हक्क सांगत आहेत. त्यामुळे आता हे पालकमंत्रिपद कुणाला मिळतं हे पाहणं महत्वाचं असेल.