‘काँग्रेसला विरोधक लागत नाही’, निलेश राणेंचा टोला
मुंबई काँग्रेसची निवड समिती आणि स्ट्रॅटेजी समितीचं अध्यक्षपद प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावलाय.
मुंबई: मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करण्यात आली असली तरी त्यांच्या अधिकारांना कात्री लावण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसची निवड समिती आणि स्ट्रॅटेजी समितीचं अध्यक्षपद प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावलाय. काँग्रेस पक्ष हा खो-खो सारखा असल्याची टीका निलेश राणेंनी केलीय. (BJP leader Nilesh Rane criticizes Congress)
“काँग्रेस पक्ष हा खो-खो सारखा आहे. कधी कोणाला खो देतील आणि कधी कोणामुळे कोण बाद होईल हे कोणालाच माहीत नसते. काँग्रेसमध्ये एकदा कोणाला पद मिळालं तर तो बाद कसा होईल याकरिता एक मोठा गट तयार असतो. काँग्रेस पक्षाला विरोधक लागत नाही,” असं ट्वीट निलेश राणे यांनी केलंय. त्यावेळी राणे यांनी टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा संदर्भ दिला आहे.
काँग्रेस पक्ष हा खो-खो सारखा आहे. कधी कोणाला खो देतील आणि कधी कोणामुळे कोण बाद होईल हे कोणालाच माहीत नसते. काँग्रेसमध्ये एकदा कोणाला पद मिळालं तर तो बाद कसा होईल याकरिता एक मोठा गट तयार असतो. काँग्रेस पक्षाला विरोधक लागत नाही.https://t.co/UKTCw070QO
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 22, 2020
मुंबई अध्यक्षांच्या डोक्यावर प्रदेशाध्यक्ष!
काँग्रेसमध्ये होणाऱ्या तिकीट वाटपाचा घोळ लक्षात घेऊन काँग्रेस हायकमांडने मुंबई काँग्रेसच्या डोक्यावर प्रदेशाध्यक्षांनाच बसवून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांची दात नखेच काढून घेतल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस श्रेष्ठींच्या निर्णयामुळे मुंबई काँग्रेसची स्वायत्ताच गेली असून हे पद निव्वळ शोभेची बाहुली बनल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष या दोन्ही स्वायत्त संस्था होत्या. मुंबईतील कोणताही धोरणात्मक निर्णय आणि पालिका निवडणुकीतील तिकीट वाटपाचा निर्णय सर्वस्वी मुंबई काँग्रेसच घ्यायची. त्यासाठी मुंबई प्रदेशाध्यक्षांच्या अंतर्गत स्क्रीनिंग समिती आणि स्ट्रॅटेजी समितीही यायची. मात्र, काँग्रेसने पहिल्यांदाच या दोन्ही समित्यांचं चेअरमनपद महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांकडे सोपवलं आहे.
सातव यांची खेळी?
मुंबई काँग्रेसच्या स्क्रीनिंग आणि स्ट्रॅटेजी कमिटीच्या चेअरमनपदाची सूत्रे प्रदेशाध्यक्षांच्या हाती देण्यामागे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव सातव यांची खेळी असल्याचं सूत्रांनी सांगितलं. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी राजीव सातव यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. हायकमांडही त्याला अनुकूल आहेत. त्यामुळे सातव आगामी काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून येऊ शकतात. अशावेळी मुंबई काँग्रेसचं नियंत्रणही आपल्या हातीच राहावं म्हणून त्यांनी ही नवी तरतूद घडवून आणणल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आघाडीऐवजी मैत्रीपूर्ण लढत?
राज्यातील आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा निर्धार वरिष्ठ पातळीवरुन करण्यात आला होता. मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुका शिवसेनेच्या साथीने लढवण्यास उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं. बीएमसी निवडणुकीत काँग्रेससोबत अधिकृत आघाडी करण्याचा शिवसेनेचाही इरादा नाही. मात्र भाजपचा पाडाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या जागांवर शिवसेना काँग्रेससोबत ‘सामंजस्य करार’ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या:
मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘एकला चलो रे’?
मुंबई काँग्रेसच्या डोक्यावर आता प्रदेश काँग्रेस?; काँग्रेसमध्ये चाललंय काय?
BJP leader Nilesh Rane criticizes Congress