मुंबई : अजित पवार यांनी शपथ घेतली तेव्हा मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचं अभिनंदन केलं. त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यावर केसरकरांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच अजित पवार यांचं बंड आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केलीय.
अजितदादा यांना मी जो फुलाचा बुके दिला होता. त्यावेळी माध्यमांचे प्रतिनिधीदेखील तिथे होते. पाहिला कोणीतरी खोडसाळ पद्धतीने तो व्हिडिओ काढला. नंतर सर्वत्र व्हायरल केला.पण माझ्या विभागाचं काम होतं. त्यासाठी मी त्यांच्याकडे काही मागणी केली आहे. शिक्षण विभागाचे काही निर्णय आम्ही घेतलेत. ते निर्णय माघारी घेण्याची शक्यता आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही अजितदादांची भेट घेतली, असं केसरकरांनी सांगितलं आहे.
संजय राऊताना आता आठवण झाली की आम्ही लोकांनी माघार घेण्याची गरज आहे. पण आता त्याचा काही उपयोग नाहीये. यापूर्वीच जेव्हा आम्ही उठाव केला होता तेव्हा आम्ही अल्टीमीटर दिला होता. पण तेव्हा आमचं कुणी ऐकलं नाही. ना संजय राऊतांनी ऐकलं ना उद्धव ठाकरेंनी ऐकलं. त्यामुळे आता बोलण्यात काहीही अर्थ नाही. आम्ही भाजपसोबत आहोत आणि आता भविष्यामध्ये पुढची रणनीती जी आहे ती सुद्धा तशीच असणार आहे, असं केसरकरांनी म्हटलं आहे.
मंत्री अनिल पाटील यांच्या स्वागतासाठी अमळनेरमध्ये शाळकरी मुलांना रस्त्याच्या बाजूला बसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याबाबत केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आला.
तेव्हा अनिल पाटील यांना देखील मी सांगणार आहे. शाळकरी मुलांचा अशा प्रकारे वापर करता कामा नये. पण मी माझ्या माहितीप्रमाणे ती मुलं त्यांच्याच अनाथ आश्रमातले आहेत. आपल्या साहेबांच्या स्वागतासाठी ती तिथे उभी होती. पण तसेच जर नसेल तर हा विषय गंभीर आहे आणि याबाबत मी त्यांच्याशी बोलणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
राज्यात लवकरच कॅबिनेटचा विस्तार होणार मला अशी अपेक्षा आहे. अधिवेशनाच्या पूर्वी हा विस्तार होईल. मंत्रिमंडळाच्या विस्तारमध्ये संजय शिरसाट भरत गोगावले बच्चू कडू यांचं देखील आम्ही स्वागत करू, असा शब्द केसकरांनी दिला आहे.