गांधींच्या विचारांवर तंतोतंत चालणारा नेता; दोनदा पंतप्रधान झाल्यावरही साधी राहणी सोडली नाही
Gulzarilal Nanda Interim Prime Minister of India : भारतात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना मानणारा, त्यांच्या विचारांवर चालणारा असा मोठा वर्ग आहे. पण तुम्हाला त्या एका नेत्याविषयी माहिती आहे का? गांधी विचारांचा पगडा असणारा नेता, दोनदा पंतप्रधान होऊनही साधी राहणी सोडली नाही. कोण? वाचा...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालणारा देश, अशी भारत देशाची जगभरात ओळख. तत्वनिष्ठ अन् आपल्या विचारांवर ठाम लोक, लोककल्याणासाठी झटणारे राजकारणी नेते अन् सुज्ञ जनता, असा भारताचा जगभरात गवागवा… पण सध्याचं राजकारण पाहिलं. वारंवार होणारी पक्षांतरं पाहिली. विचारांची होणारी पडझड पाहिली की मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. अशावेळी काही तत्वनिष्ठ राजकारणी मंडळींची प्रकर्षांने आठवण होते. अर्थशास्त्रज्ञ अन् कामगार प्रश्नांची जाण असणारे नेते गुलझारीलाल नंदा यापैकीच एक… तंतोतंत गांधींच्या विचारांवर चालणारा नेता अशी गुलझारीलाल नंदा यांची ओळख…
अत्यंत साधी राहणी
गुलझारीलाल नंदा हे दोनदा देशातचे पंतप्रधान झाले. मात्र त्यांनी आपली साधी राहणी सोडली नाही. ते अत्यंत साध्या पद्धतीने जीवन जगत असत. दोनदा पंतप्रधान होऊनही ते भाड्याच्या घरातच राहिले. ते इतके तत्व निष्ठ होते की, सरकारी कार्यालयातला कागदही त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी वापरला नाही. निवृत्तीनंतरही ते भाड्याच्या घरातच राहिले. जेव्हा गुलझारीलाल नंदा यांचं निधन झालं तेव्हा एखाद्या पिशवीत मावेल, इतकंच त्याचं साहित्य होतं.
दोनदा देशाचे पंतप्रधान झाले
कधीही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसणारे गुलझारीलाल नंदा हे दोनदा देशाचे पंतप्रधान झाले. तत्कालिन पंतप्रधानांचं निधन झाल्यानंतर काळजीवाहू पंतप्रधानपदाची जबाबदारी गुलझारीलाल नंदा यांनी सांभाळली. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं 27 मे 1964 ला निधन झालं. यावेळी 9 जून 1964 पर्यंत गुलझारीलाल नंदा यांनी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम केलं. तत्कालिन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं 11 जानेवारी 1966 या दिवशी निधन झालं. तेव्हा पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची जबाबदारी गुलझारीलाल नंदा यांच्यावर आली. पुढे 13 दिवस ते देशाचे काळजीवाहू पंतप्रधान राहिले.
गांधीवादी विचारांचा प्रभाव
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुलझारीलाल नंदा हे प्राध्यापक झाले. तेव्हा मुंबईच्या नॅशनल कॉलेजमध्ये शिकवत शिकवत असताना त्यांची गांधीजींशी ओळख झाली. तेव्हा गांधी विचाराने ते प्रचंड प्रभावित झाले. 1920-21 हा काळ गुलझारीलाल नंदा यांच्या जीवनाला कलाटणी देणारा काळ होता. या काळात त्यांची महात्मा गांधी यांच्याशी अधिक ओळख झाली. तेव्हा गांधींच्या असहकार आंदोलनात ते सक्रीय झाले. कामगारांच्या प्रश्नांची त्यांना आधीपासूनच जाण होती. या चळवळीत त्यांच्या विचारांवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव झाला तो कायमचा… त्याच गांधीवादी विचारांवर ते कायम चालत राहिले.