राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप, मार्ड संघटनेचं काम बंद, जे जे रुग्णालय परिसरात डॉक्टरांचा जमाव
जेजे रुग्णालय परिसरात मार्ड संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश दहीपळे उपस्थित आहेत. तसेच संघटनेचे अनेक सदस्य जमण्यास सुरुवात झाली आहे.
अविनाश माने, मुंबईः कोरोना (Corona) संकट पुन्हा एकदा राज्यावर घोंगावत असतानाच निवासी डॉक्टरांनी (Doctor) संप पुकारला आहे. महानगरपालिका (Municipal Corporation) आणि राज्यातील सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना भेडसावणारे प्रश्न आणि त्यांच्या विविध मागण्या या वैद्यकीय शिक्षण विभाग आणि मुंबई महापालिकेकडे ‘मार्ड’ संघटनेने वारंवार मांडल्या आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप संघटनेने केला आहे. याविरोधात आज मार्ड संघटनेने संपाचा इशारा दिला होता. आता जेजे रुग्णालय परिसरात मार्ड संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश दहीपळे उपस्थित आहेत. तसेच संघटनेचे अनेक सदस्य जमण्यास सुरुवात झाली आहे.
सोलापुरातही आंदोलन
निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी सोलापुरातही आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील 7 हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. अतिदक्षता विभाग वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. शासकीय आणि महाविद्यालय निवासी डॉक्टरांकडून निदर्शने करण्यात येत आहेत.
सोलापुरातील मार्डच्या आंदोलनात 100 निवासी डॉक्टर सहभागी आहेत. महाराष्ट्रातील सर्व शासकीय, पालिका महाविद्यालयात अपुऱ्या व मोडकळीस आलेल्या वस्तीगृहामुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरावे, अशीदेखील त्यांची मागणी आहे.