Breaking | वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार? आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निहार ठाकरे? शिंदे गटाची रणनीती काय?
आगामी विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदार संघाची निवडणूक राज्याचं लक्ष वेधून घेणारी ठरण्याची दाट शक्यता आहे.
दिनेश दुखंडे, मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुत्र, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वरळी विधानसभा मतदार संघात आगामी विधानसभा निवडणूक अत्यंत रंगतदार दिसण्याची शक्यता आहे. शिंदे गटातर्फे या विधानसभा मतदार संघात आदित्य ठाकरे यांचे चुलत बंधू निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांना उतरवलं जाणार असल्याची चाचपणी सुरु आहे. शिंदे गटातील विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 च्या प्रतिनिधींना ही माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदार संघाची निवडणूक राज्याचं लक्ष वेधून घेणारी ठरण्याची दाट शक्यता आहे.
कोण आहेत निहार ठाकरे?
- निहार ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठे बंधू स्व. बिंदुमाधव ठाकरे यांचे पुत्र आहेत.
- एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
- निहार ठाकरे हे पेशाने वकील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कायदेशीर लढाईत ते सल्ला देत असतात.
- सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारचा सत्तासंघर्ष सुरु आहे, या प्रकरणात शिंदे गटाने जी कोअर कमिटी नेमली आहे, त्यात निहार ठाकरे यांचा समावेश आहे.
- एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत, म्हणून माझा त्यांना पाठिंबा असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती.
आदित्य ठाकरे यांचं चॅलेंज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आदित्य ठाकरे यांनी चॅलेंज दिलं आहे. हिंमत असेल तर मुख्यमंत्रीपद आणि आमदारकीचा राजीनामा द्या. जनतेत उतरून निवडणूक लढवून दाखवा, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय. तुम्ही ठाण्यात लढणार असाल मी ठाण्यात येतो अन्यथा माझ्या वरळी मतदार संघात माझ्याविरुद्ध लढवून दाखवा, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलंय.
संजय राऊत काय म्हणाले?
आदित्य ठाकरे या ३२ वर्षीय तरुणाने दिलेल्या आव्हानाला महाराष्ट्र सरकार घाबरले असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वरळीत जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकटे येत नसून जोडीला गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा आणत आहेत. यावरूनच मुख्यमंत्री कसे घाबरले आहेत, हे महाराष्ट्र पाहतोय, अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे.