मंत्रिमंडळ विस्तार होणार की वाद वाढणार?; राज्याच्या राजकारणातील आताच्या घडीच्या तीन मोठ्या बातम्या
Maharashtra Cabinet Expansion : अजित पवार नाराज? शिंदे गट आक्रमक; युती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार की वाद वाढणार? महायुतीमध्ये हालचाली वाढल्या, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मागच्या वर्षभरापासून लांबणीवर पडला आहे. आता लवकरच शपथविधी पार पडेल असं बोललं जात आहे. मात्र या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही खात्यांवरून सध्या पेच पाहायला मिळत आहे. अजित पवार यांची नाराजी पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही खातेवाटपासंदर्भात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तर बच्चू कडू देखील नाराज असल्याची माहिती आहे.
1. अजित पवार नाराज
खातेवाटपावरून अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे. अर्थखातं आपल्याकडे राहावं, यासाठी ते आग्रही असल्याचं कळतं आहे. पण अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं दिलं जाऊ नये, यासाठी शिंदेगट आक्रमक झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळे अजित पवार यांची नाराजी पाहायला मिळत आहे.
आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बैठक होणार आहे. काल अमित शहांशी भेट झाल्यानंतर अजित पवार साधणार संवाद आहेत. बैठकीत काय चर्चा झाली, यावर अजित पवार वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. अजित पवार यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘देवगिरी’ बंगल्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. खातेवाटपात कोणतीही अडचण येणार नाही. कालच्या दिल्लीत अमित शहांसोबतच्या बैठकीत मार्ग निघाला असावा, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे.
2. शिंदे गट आक्रमक
अजित पवार काही खाती आपल्याकडे राहावीत यासाठी आक्रमक आहे. यात प्रामुख्याने अर्थ खातं आहे. अर्थखातं अजित पवार यांच्याकडे दिलं जाऊ नये, अशी भूमिका शिंदे गटाची आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं गेल्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांना अधिक निधी दिला जाईल तर इतरांवर अन्याय होईल. अशी शिंदे गटाची भूमिका आहे.
3. बच्चू कडू भूमिका जाहीर करणार
आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळेल, असं शिंदे सरकार स्थापन झाल्यापासूनच बोललं जात आहे. पण आता होणाऱ्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. अशातच आता बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मला फोन आला आहे. मंत्रिमंडळात सामील व्हायचं की नाही व्हायचं या संदर्भात निर्णय 11 वाजता मी कुरळ पूर्णा इथे जाहीर करणार आहे. येत्या काळात काय भूमिका घ्यायची? याबाबतही मी बोलणार आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.
मंत्रिमंडळ विस्तार आतापर्यंत का रखडला होता, यावर शिंदे आणि फडणवीस बोलतील. मी काय भूमिका घेणार ते अकरा वाजता जाहीर करेल. अपक्षांना स्थान दिलं जात नाही, असं काहीही नाही. मुंबईला जायचं की गावात राहायचं हे ही सांगणार आहे. यापुढे कोणासाठी राजकारण करायचं, कशासाठी करायचं, हे ठरवणार आहे. याची भूमिका 11 वाजता जाहीर करणार आहे, असं ते म्हणालेत.
दरम्यान बच्चू कडू कुरळपूर्णाकडे रवाना झाले आहेत. सकाळी 11 वाजता प्रहारच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बच्चू कडू चर्चा करणार आहेत. त्यामुळे बच्चू कडू काय निर्णय घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.