मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे या आज रात्री शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनिषा कायंदे या मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. मनिषा कायंदे या नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोन बंद आहे. शिवाय त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. तर आज मनिषा कायंदे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
मनिषा कायंदे या आक्रमक नेत्या आहेत. जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा तेव्हा त्यांनी शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडली. शिवसेनेची ढाल म्हणून त्या कायम विरोधकांसमोर उभ्या राहिल्या. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. शिवसेना ठाकरे गटाच्या अभ्यासू आणि आक्रमक नेत्या ही त्यांची ओळख आहे. त्यामुळे मनिषा कायंदे यांच्या शिवसेनेत जाण्याने ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे.
मनिषा कायंदे मूळच्या शिक्षिका होत्या. पण त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली तेव्हा पासूनच ठाकरे गटातील नेते आणि विशेष करून महिला नेत्यांमध्ये नाराजी होती. हा सगळा विरोध पत्करून उद्धव ठाकरे यांनी कायंदेंना उमेदवारी दिली. मात्र आता त्याच पक्ष सोडून जात असल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा कचरा इकडे तिकडे उडत असतो. हवेचा झोका बदलला की तो कचरा पुन्हा आमच्या दारात येऊन पडतो, असं संजय राऊत म्हणालेत.
शिशिर शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. ठाकरे गटाचं उपनेतेपद शिशिर शिंदे यांच्याकडे होतं. या उपनेतेपदाचा राजीनामा शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे काल सुपूर्द केला आहे. शिशिर शिंदे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.