मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : सध्याच्या सरकारमध्ये असणारे नेते फक्त मुख्यमंत्रिपद, उपमुख्यमंत्रिपद आणि आमदारांना जवळ ठेवण्यासाठी आमदारांना खुश ठेवण्यातच व्यस्त आहेत. तर मग जिल्हा प्रशासन इतर सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून सामान्य लोकांचे प्रश्न कसे सोडवले जाणार? आज महाराष्ट्रातल्या जनतेची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. कुठेही त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. सरकारचं लक्ष फक्त सत्तेवर आहे. लोकांच्या प्रश्नांकडे यांचं लक्ष नाही. भाजपबरोबर गेल्यानंतर सुरुवातीला या लोकांना बरं वाटलं. गारगार वाटलं. पण आता कुठेतरी भाजपाची प्रवृत्ती समोर यायला लागली आहे. दिसायला लागलीय, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे.
छोटे छोटे नेते त्यांच्या नेत्यांबद्दल बोलायला लागले आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याच गटामध्ये मोठ्या गटांमध्ये वरच्या गटामध्ये अस्वस्थता जाणवते आहे. हे तुम्ही आजच्या लोकांशी बोलून बघा. भाजपच्या मनात काय? भाजप नेत्यांनाचं तुम्ही नेहमी लोकनेत्यांना संपवता आहात. भाजपमध्ये असणारेच लोकनेते राजकीय दृष्टिकोनातून संपवलेले आहेत, असंही रोहित पवार म्हणालेत.
जे जे नेते इतर पक्षातून त्यांनी आयात केले. ते लोकनेते पूर्वी होते. ते सुद्धा संपले होते. आता भीती सगळ्यांना हीच वाटते. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ही भीती वाटते की शिंदेसाहेबांचं महत्त्व हळूहळू कमी केला जाईल. तसंच राष्ट्रवादीतून जे नेते तिकडे गेलेले आहेत. त्यांचं सुद्धा महत्व कमी केलं जाईल. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघांमध्ये जर तुमची युती असेल. तडजोड असेल. मग तिथे भाजप बैठका घ्यायचं कारण काय? तिथे चाचणी आणि सर्वे करायचं कारण काय? भाजपला फक्त त्यांचं चिन्ह त्यांचा पक्ष समजतो. बाकी कुठलेही नेते लोकांचे प्रश्न कळत नाही. भाजप अशी परिस्थिती नक्कीच आणेल जेणेकरून त्यांच्याबरोबर गेलेले सर्वच नेते भाजपच्या चिन्हावर लढतील, असंही रोहित पवार म्हणालेत.
ठाणे जिल्ह्याची जबाबदारी अनुराग ठाकूर यांना दिलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांचा मुलगा खासदार आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांना तिकडे जबाबदारी दिलेली आहे, असं दबक्या आवाजात कळतं आहे. कल्याण मतदार संघात पीडब्ल्यूडी मिनिस्टर रवींद्र चव्हाण यांना कदाचित भाजपकडून इथून उमेदवारी दिली जाऊ शकते, असंही रोहित पवारांनी म्हटलं.