मुंबई | 02 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज आत्महत्या केली. एन डी स्टुडिओमध्ये गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या अशा अचानक एक्झिटमुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकीय क्षेत्रातूनही देसाई यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो, त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासं आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो, हे अनाकलनीय आहे. नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल?, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.
नितीन देसाई यांच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे. असो,कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा. नितीन देसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली, असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस… pic.twitter.com/tJjqeXeH4q
— Raj Thackeray (@RajThackeray) August 2, 2023
मनसे नेते अभिजित पानसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना नितीन देसाई यांच्याशी तीन दिवसांआधी बोलणं झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नितीन देसाई यांचं जाणं अतिशय वेदनादायी आहे. हे दुःख कधीही भरून निघणार नाही. नितीन देसाई हे कला दिग्दर्शनातील मोठं नाव होतं. त्यांची कलाकृती म्हणजे भव्यदिव्यतेचं आणि नाविन्याचं उत्तम उदाहरण होतं. नितीन देसाई आणि माझं संवाद तीन दिवसापूर्वीच बोलणं झालं होतं. लवकरच भेटलं पाहिजे, असं आम्ही म्हणालो. मुंबईला भेटायचं की पुण्याला यावरही आम्ही चर्चा केली, असं अभिजीत पानसे म्हणालेत.