मुंबई : आज नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. त्यावर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. माजी मंत्री, काँग्रेसचे वरिष्ठ नेते नसीम खान यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यावरही नसीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख आहेत. त्यांच्या हातातून उद्घाटन होईल, अशी अपेक्षा लोकांना होती. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना साधं बोलावलेलंही नाही. आमचा उद्घाटनाला विरोध नाही. मात्र एक महिला राष्ट्रपतीच्या हाताने उद्घाटन झालं असतं तर जगामध्ये वेगळा संदेश गेला असता, अशी मागणी राहुल गांधी यांनीही केली होती. विरोधी पक्षातील नेत्यांनीही हीच मागणी केली होती. मात्र इथे लोकशाहीच्या नावाखाली हिटलरशाही सुरू आहे हे आता सिद्ध झालं आहे, असं नसीम खान म्हणालेत.
भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या ठिकाणी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. इथे राष्ट्रवादी की काँग्रेसचा उमेदवार द्यायचा यावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यावरही नसीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीमध्ये स्वातंत्र्य आहे. महाविकास आघाडीत जिथे जो जो पक्ष बळकट आहे, मजबूत आहे तो तिथे लढणार आहे. मग ती लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा. आमच्या सर्वांची अशी भूमिका असून सर्वांशी चर्चा देखील झाली आहे. पुण्यामध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणूक झाली. तेव्हा काँग्रेस भरघोस मतांनी निवडून आली. रविंद्र धंगेकर निवडून आले. याआधीचा इतिहास आहे अनेक वेळा ती लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाने जिंकलेली आहे, असं नसीम खान यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस पक्षाची ती पारंपारिक जागा आहे. मात्र अनेक विषयावरती ज्या वेळेला चर्चा होईल महाविकास आघाडीच्या मिरीटवर जेव्हा चर्चा होईल. तेव्हा आम्ही आमचा विषय पुन्हा ठेवणार. प्रश्न मागे हटण्याचा नाही काँग्रेस पुणे पोटनिवडणुकीसाठी आम्ही दावा करणार आहोत, असं नसीम खान म्हणाले आहेत.