व्हायरल ऑडिओ क्लिप अन् त्यानंतरची कठोर भूमिका, सरसकट मराठा आरक्षणाला विरोध; छगन भुजबळ यांच्या नव्या वैचारिक लढाईची नांदी?
NCP Leader Chhagan Bhujbal on Maratha Reservation : व्हायरल ऑडिओ क्लिप अन् त्यानंतर घेतलेली कठोर भूमिका... मंत्री छगन भुजबळ नव्या वैचारिक संघर्षाच्या तयारीत आहेत का? छगन भुजबळांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या टर्निंग पॉईंटमध्ये याचा अर्थ दडलाय... वाचा सविस्तर...
मुंबई | 07 नोव्हेंबर 2023 : छगन भुजबळ… ठाम भूमिका घेणारे नेते म्हणून ते परिचित आहेत. ओबीसींच्या प्रश्नांसाठी ते लढत असतात. छगन भुजबळ आता पुन्हा एकदा वैचारिक संघर्षाच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न महाराष्ट्रात चर्चेत आहे. त्याचं कारण आहे, मागच्या काही दिवसात छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेली कठोर भूमिका… मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याला आपला विरोध असल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. तसंच ओबीसींच्या आरक्षणावर या सगळ्याचा परिणाम होईल, असंही छगन भुजबळ म्हणालेत. मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे छगन भुजबळ हे नव्या वैचारिक लढाईच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा होतेय. ओबीसींच्या हक्कांसाठी छगन भुजबळ यांनी वेळप्रसंगी विरोध पत्करून कठोर भूमिका घेतली, याला इतिहासातील घटना साक्षिदार आहेत.
मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांची भूमिका काय?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वर्तुळ ढवळून निघालं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी उपोषणाचं शस्त्र उपसलं. आरक्षण मिळत नाही, तोवर मागे न हटण्याच्या मुद्द्यावर जरांगे ठाम आहेत. त्यामुळे सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या लढ्यात आधीपासूनच मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायला विरोध दर्शवला. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि त्यानंतर दिल्या जाणाऱ्या सरसकट आरक्षणाला छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण दिल्यासा त्याचा इतर ओबीसींवर परिणाम होईल, असं भुजबळ म्हणत आहेत.
मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच बीडमध्ये जाळपोळ झाली. नेत्यांची घरं गाड्या जाळल्या गेल्या. या जाळपोळीनंतर छगन भुजबळ यांनी तिथ जात पाहणी केली. ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला. छगन भुजबळ यांचं बीडमध्ये जाणं झालेल्या नुकसानीचा आढावा घेणं. हे बरंच काही सूचित करतं.
‘तो’ प्रसंग, अन् भुजबळ यांनी शिवसेना पक्ष सोडला
मंडल आयोगाचा मुद्दा तेव्हा प्रचंड गाजला होता. छगन भुजबळ हे शिवसेनेत होते. पण तेव्हा शिवसेना मंडल आयोगाच्या बाजूने भूमिका घेताना दिसत नव्हती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मंडला आयोगाला विरोध केला. तर तत्कालिन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषणा केली की महाराष्ट्रात आपण मंडल आयोगाची अंमलबजावणी करतो आहोत. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा हात सोडून छगन भुजबळ शरद पवार यांच्यासोबत आले. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय होता.
भुजबळ संघर्षाच्या तयारीत?
जेव्हा जेव्हा ओबीसींच्या हक्कांचा प्रश्न आला. तेव्हा तेव्हा छगन भुजबळ ठाम भूमिक घेताना दिसलेत. याच मुद्द्यावरून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडली. आता पुन्हा एकदा छगन भुजबळ हे संघर्षाच्या तयारीत दिसत आहेत. त्यामुळे छगन भुजबळ पुन्हा एकदा नव्या वैचारिक लढाईत उतरलेले दिसले तर वावगं वाटायला नको.