मुंबई : मुंबईच्या बोरिवलीतील राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासींची आमदार बच्चू कडू यांनी भेट घेतली. आदिवासींची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन आदिवासींच्या मूलभूत सुविधा आणि पुनर्वसन याबाबत चर्चा केली. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी भाजप आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची आठवण करून दिली आहे.
देशात नरेंद्र मोदी तर राज्यात एकनाथ शिंदे अशी जाहिरात वर्तमान पत्रात झळकली. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, असं उदाहरण देत अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर टीका केली आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
अनिल बोंडेला माहित नाही की आज आपल्याला जो आदर आहे कशामुळे आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केला नसता तर हे सगळं घडलं असतं का? अनिल बोंडेंना समजावून सांगितलं पाहिजे की, या संपूर्ण प्रकरणात भोंडे यांच्या बोलण्यामुळे पक्ष आणि सरकार दोन्हीमध्ये अडचण निर्माण झाली आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. अजित पवार आणि शरद पवार यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. प्रभू रामचंद्र आणि रावणाची तुलना होऊ शकत नाही, बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कधीच होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाचा स्वतःचा वेगळा विषय आहे. प्रत्येकाची प्रतिष्ठा वेगळी आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.
उल्हासनगरमधील भाजपच्या पोस्टरवरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही कोणाचेही बॅनर लावू शकतो. काहीही लिहू शकतो. त्या बॅनरला काही अर्थ आहे का? त्या बॅनरला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं ते म्हणालेत.
बच्चू कडू यांनी आदिवासी प्रश्नांवरही प्रतिक्रिया दिली आहे. आदिवासी पाड्यात पाण्याची लाईन नाही. मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. राष्ट्रीय उद्यानाच्या नावाखाली ही सुविधा बंद केली आहे. आज मी अधिकाऱ्यांशी बोललो. सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही बोललो. उच्च न्यायालयाच्या निर्णयात मुलभूत सुविधा देता येत नाहीत, हे चुकीचे आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.