मुंबई : एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं. हे बंड होण्यामागची कारणं काय होती? याची चर्चा राजकीय वर्तुळात मागच्या वर्षभरात चर्चेत राहिली. त्याची वेगवेगळी कारणंही शिंदे गटाकडून देण्यात आली आहेत. त्याची चर्चाही होते. शिंदे गटाने गद्दारी केली, असा आरोप ठाकरे गट करतो. आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बंडखोरीचं कारण सांगितलं आहे.
बाळासाहेब ठाकरेंनी स्वाभिमानच आम्हाला शिकवला आहे. कधी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसू नका, ही त्यांची शिकवण होती. त्यामुळे आम्ही मागच्या वर्षी 20 तारखेला उठाव केला. त्यात आम्ही सामील झालोय. आमचा हा स्वाभिमान दिन आहे. तर ठाकरे गटाचा गद्दार दिन आहे, असं उदय सामंत म्हणालेत.
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून खोके दिन साजरा केला जाणार आहे. राष्ट्रवादी आजचा दिवस गद्दार दिन म्हणून साजरा करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधक टीका करणार आहेत. सत्ता गेल्यानंतर जी तडफड होते, त्याच उदाहरण आहे. काही लोकांनी सांगितलं आहे आजचा दिवस गद्दार साजरा केला पाहिजे. काही खोके दिन साजरा केला पाहिजे . मी असं समजतो की शिवसेना भाजप युती असताना आम्ही निवडून आलोय त्यानंतर मतदारांशी त्यांनी गद्दारी केली. ते गद्दार दिन साजरा करतात, असं सामंत म्हणालेत.
20 जूनला ज्यांचे खोके बंद झाले. ते खोके दिन साजरे करत आहेत. त्यामुळे त्यांना अजिबात मला किंमत द्यायची नाही. महाराष्ट्राने एकनाथ शिंदे यांचा नेतृत्व स्वीकारलं आहे, हे सिद्ध झालं आहे. आमच्या खऱ्या शिवसेनेला काही कमी पडणार नाही. याची मला खात्री आहे, असं सामंतांनी म्हटलं आहे.
खोटा इतिहास लिहिण्यात अनेक लोक पारंगत आहेत. वैयक्तिक पातळीवरचे टीका करणं, काही लोकांचा धंदा बनला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्न उत्तर देणं, मला योग्य वाटत नाही. ते रिकामे आहेत. ते नऊ वाजता सुरू होतात. रात्री साडेदहा वाजता थांबतात. आम्हाला काम आहेत. आम्ही ती काम करतो, असं म्हणत उदय सामंत यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.