राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? जयंत पाटील यांनी ‘अंदर की बात’ सांगितली
भाकरी फिरवण्याचं विधान अन् राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबतचा शरद पवार यांचा निर्णय; जयंत पाटील यांची सविस्तर प्रतिक्रिया
मुंबई : शरद पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान नेमकं काय काय घडलं याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
बैठकीत नेमकं काय घडलं?
आमची निवड समितीची बैठक घेतली. यात शरद पवारच अध्यक्ष राहावेत याबाबत सर्वांचंच एकमत आहे. तसा ठरावही आम्ही मंजूर केला आहे. पक्षातील सर्व नेत्यांनी एकमताने मंजूरी दिली, असं जयंत पाटील म्हणाले.
निवड समितीच्या सदस्यांनी सिल्व्हर ओकवर जात शरद पवार साहेब यांना आमचा निर्णय सांगितला आहे. आम्हाला पक्षाध्यक्षपदी आपणच हवा आहात. त्यामुळे आमच्यासह राज्यभरातील कार्यकर्त्यांची मागणी आपण मान्य करावी, अशी विनंती आम्ही पवारसाहेबांना केली, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
शरद पवार यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेत शरद पवार अध्यक्षपदाबाबत निर्णय जाहीर करतील का?, असं विचारण्यात आलं तेव्हा शरद पवार यांची ही पत्रकार परिषद नेमकी कशासाठी होतेय, याची कल्पना नाही. आम्ही त्यांना आजच निर्णय जाहीर करण्याची विनंती केली आहे. पण पवारसाहेब यांची पत्रकार परिषद नेमकी कशासाठी होतेय, ते या सगळ्या विषयावर बोलणार आहेत का? याबाबत कल्पना नाही, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला
राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक पार पडली. यात दोन प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन प्रस्ताव मांडले. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा पहिला प्रस्ताव राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. तर शरद पवार पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्हावेत, असा दुसरा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी मांडला आहे.
शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे.