मुंबई | 17 जुलै 2023 : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या अधिविशेनात विविध मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. अजित पवार हे युती सरकारमध्ये सामी झाल्यानंतरचं हे पहिलं अधिवेशन आहे. त्यामुळे सत्ताधारी महत्वाचे प्रस्ताव ठेवण्याची शक्यता आहे. तर त्याला विरोधक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं असेल. या अधिवेशन काळात दहा मुद्दे महत्वाचे ठरतील.
1. मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप
2. कृषी खात्याच्या बोगस धाडी
3. महसूल विभागातील बदल्यांचं प्रकरण
4. राज्यातील जातीय दंगली
5. महिलांवरील अत्याचार, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न
6. .अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा
7. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अनुदान, शेतमालाला न मिळणार भाव
8. मुंबई पालिकेच्या ठेवींच्या उधळपट्टीचा आरोप
9. मुंबईतील काँक्रिट रस्त्यातील भ्रष्टाचाराचे आरोप
10. मुंबई-ठाण्यातील एलईडी लाईट सुशोभिकरणावरील खर्च
अधिवेशन काळात विविध मुद्दे गाजणार आहेत. मात्र आणखी काही मुद्द्यांकडे अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा आहेत.
1. शिंदे- फडणवीसांसोबतच अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतरचं पहिलं अधिवेशन आहे.
2. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने सत्ताधाऱ्यांची ताकद वाढली आहे.
3. शिवसेनेनंतरच्या राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळ विरोधी पक्षाची ताकद कमी झाली. त्यामुळे विरोधकांची कसोटी पाहणारं हे अधिवेशन आहे.
4. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण? या बाबतचा पेच कायम आहे.
5. अजित पवार गट सत्ताधारी आणि विरोधकांच्या आसनव्यवस्थेचा नवा पेच निर्माण झाला आहे.
मागच्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर युती सरकार सत्तेत आलं. त्यानंतर आता यावर्षी अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर विधिमंडळाचं पहिलं अधिवेशन पार पडतं आहे. यात सत्ताधारी कोणते प्रस्ताव मांडणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
सत्ताधाऱ्यांनी प्रस्ताव मांडल्यानंतर विरोधक कोणते मुद्दे मांडणार, शिवाय या अधिनेशनात कोणत्या मुद्द्यांकडे सरकारं लक्ष वेधणार हे पाहणं महत्वाचं असेल. शिवाय एकनाथ शिंदे यांचं बंड त्या पाठोपाठ अजित पवार यांचं भाजपसोबत जाणं यामुळे विरोधकांना आपल्याच जुन्या सहकाऱ्यांना प्रश्न विचारावे लागणार आहेत. त्यामुळे विरोधक आक्रमक भूमिकेत दिसणार हे स्पष्ट आहे.