इंडिया बैठकीला पंचपक्वान्न; मनसेकडून टीका, म्हणाले, जरा महाराष्ट्रातील ‘या’ प्रश्नांकडेही लक्ष द्या
MNS Leader Ameya Khopkar on India Meeting At Grand Hyatt : सत्तापिपासू नेत्यांच्या गर्दीत जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा एकच पक्ष मनसे!; या नेत्याचं 'INDIA'च्या बैठकीवर टीकास्त्र, वाचा सविस्तर...
मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आलेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीची आज मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीसाठी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये या बैठकीसाठी दाखल झाले आहेत. यासाठी ग्रँड हयात हॉटेलमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. या नेत्यांच्या जेवणाचीही खास सोय करण्यात आली आहे. यात खास करून पारंपरिक मराठी पदार्थांचा समावेश करण्यात आलं आहे. या बैठकीवर आणि जेवणातील पदार्थांवर मनसेकडून टीका करण्यात आली आहे. ही टीका करतानाच महाराष्ट्रातील महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आलं आहे.
मनसेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी इंडियाच्या बैठकीवर निशाणा साधला आहे. इंडियाच्या बैठकीत पंचपक्वान्नाच्या पंगती उठतायेत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाज वाटत नाही का?, असा सवाल अमेय खोपकर यांनी विचारला आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे.
अमेय खोपकर यांचं ट्विट जसंच्या तसं
राज्यात ३ आठवड्यांपासून पाऊस गडप झालाय. बळीराजाची चिंता वाढलेली आहे. दुष्काळाचं संकट गहिरं होतंय. मविआ नेते एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करतायत आणि दुसरीकडे I.N.D.I.Aआघाडी बैठकीआधी राज्याच्या राजधानीत पुरणपोळी, करंजी, मोदक अशा पंचपक्वान्नाच्या पंगती उठतायत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाजही वाटत नाही. सत्तापिपासू नेत्यांच्या या भाऊगर्दीत जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा एकच पक्ष आहे आणि मी अशा मनसे पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे याचा मला अभिमान आहे.
राज्यात ३ आठवड्यांपासून पाऊस गडप झालाय. बळीराजाची चिंता वाढलेली आहे. दुष्काळाचं संकट गहिरं होतंय. मविआ नेते एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करतायत आणि दुसरीकडे I.N.D.I.Aआघाडी बैठकीआधी राज्याच्या राजधानीत पुरणपोळी, करंजी, मोदक अशा पंचपक्वान्नाच्या पंगती उठतायत.… pic.twitter.com/nFppoly3mJ
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) August 31, 2023
मनसे नेते अमेय खोपकर यांच्या टीकेला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. भाजपने पुन्हा सुपारी बाज लोकांना कामाला लावलं आहे. इंडियाच्या बैठकीमुळे भाजप पक्ष कमालीचा अस्वस्थ झाला आहे. अशावेळी या सुपारीबाज लोकांना कामाला लावलं जात आहे. अमेय खोपकर सारख्या लोकांना किती आणि का महत्व द्यायचं?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. अमेय खोपकर यांनी इंडियाच्या बैठकीवर केलेल्या टीकेनंतर सुषमा अंधारे यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
जेवणासाठी कोणते पदार्थ?
नाश्त्यासाठी बाकरवडी, नारळी वडी, नाचणीचे वेफर्स आणि वडापाव ठेवण्यात आला आहे. तसंच चहा आणि कॉफी, नारळपाणी, लिंबूपाणी, नारळाची करंजी, दुधी मावा, मोदक. श्रीखंड पुरी, भरलेल्या वांग्याची भाजी, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी ठेवण्यात आले आहेत.