मुंबई | 04 सप्टेंबर 2023 : मागच्या वर्षी एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत गेले. तेव्हा ठाकरे गटाने ‘गद्दार’ म्हणत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. ईडी सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी हा पर्याय जवळ केल्याचं बोललं गेलं. आताही अजित पवार समर्थक आमदारांसह भाजपसोबत गेले आहेत. यातील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा होता. पण आता हेच नेते युती सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. या नेत्यांना भारतरत्न,पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार देण्याची तयारी सुरु आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
ईडीने कालपर्यंत अजित पवार बाबत काय केलं? कालपर्यंत धाडी टाकण्यात येत होत्या. कालपर्यंत तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करत होतात. जरंडेश्वर कारखान्यावर जप्ती आली. पण अचानक चारशिटमधून नाव काढलं गेलं. गुनेहा मागे घेतले. जरंडेश्वर कारखाना मोकळा झाला. हसन मुश्रीफ यांना आता महात्मा पदवी देत आहेत. येत्या 26 जानेवारीला प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ, यांना पद्मभूषण, पद्मविभूषण तर कुणाला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, म्हणून किरीट सोमय्या देणार असल्याचं कळतंय. भावना गवळी ,राहुल शेवाळे यांना सर्वांना यावेळी पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. तशी शिफारस करण्याबाबत नाकारता येत नाही आणि ईडीच्या शिफारशीने हे होऊही शकतं, असं संजय राऊत म्हणाले.
शिखर बँक चौकशी वगैरे होणार नाही. आता यांना महात्मा पदव्या देतात. ब्रिटिश काळात त्यांना रावसाहेब अशा पदव्या देत असत. त्यांनी कितीही गुन्हे केलेले असून द्या ईडीग्रस्त लोक भाजपच्या वाशिममध्ये गेले. त्यांना पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्कार देतील. ज्यांनी दहावीस हजार कोटीचा कोणी भ्रष्टाचार केला असेल त्यांना भारतरत्न देखील देतील. त्यांचा आता काही भरोसा नाही, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी जालन्यातील लाठीमारावर प्रतिक्रिया दिली. हे सरकार जनरल डायरचं आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे .शासन आपल्या दारी या कार्यक्रमात कुठल्या अडथळा येऊ नये ,या जाब विचारू नये. यासाठी हे आंदोलन चीरडून टाका, असे आदेश वरून आले. पोलिसांनी आदेशाचं पालन केलं. महाराष्ट्रात जनरल डायर कोण? हे महाराष्ट्रात सर्वांना समजलं आहे. महाराष्ट्रात जनरल डायरचं राज्य आहे. राज्यात सध्या एक नाही तर तीन-तीन जनरल डायर आहेत. जनरल डायरच्या मानसिकतेने राज्य चालवलं जात आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर घणाघात केलाय.