Narendra Modi Birthday : नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी संजय राऊतांकडून कौतुक; म्हणाले, बाकी काही असो पण…
MP Sanjay Raut on PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिल्या शुभेच्छा!, म्हणाले, बाकी काही असो पण... शिंदे सरकारलाही लगावला टोला, वाचा...
मुंबई | 17 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही पंतप्पधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांचं कौतुकही संजय राऊतांनी केलं आहे. आमच्यात कितीही मतभेद असो. पण नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घ आयुष्य मिळो. त्यांच्या हातून देशाची सेवा घडत राहो. नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कठीण काळात देशाचे नेतृत्व केलं आहे. हे मान्य केलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणालेत.
आज देशासमोर अनेक समस्या आहेत. मणिपूरपासून बेरोजगारी आणि महागाईपर्यंत अशा अनेक समस्यांना देशासमोर आहेत. त्यांना पुढच्या वर्षापर्यंत या समस्यांना तोंड द्यावं लागेल. जोपर्यंत ते सत्तेत आहे. तोपर्यंत त्यांना अशा समस्यांशी संघर्ष करण्याचं बळ मिळो.याच सदिच्छा, असं संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या नावाने योजना सुरू करत आहेत. जर 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टीतून होत असेल तर ते चुकीचं आहे. ते आपलं कर्तव्य आहे. तुम्ही अशा किती योजनाला कुठल्या नेत्याचं नाव दिली. तरी मतं मिळत नाहीत. देशावर अनेक समस्या आहेत. अनेक संकटं आहेत. जर देशाचा विचार केला तर आजही देशातील जनता अस्वस्त व अस्थिर आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
परवापासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे चाकरमानी कोकणात जाण्यासाठी निघाले आहेत. ट्रेन आणि बसला प्रचंड गर्दी आहे. पण रस्त्यांतील खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त आहेत. यावर प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी याला उत्तर दिलं. मी स्वतः चिंतेत आहे. मला उद्या कोकणात गावाला जायचं आहे. सकाळपासून मी आणि बंधू आमदार सुनील राऊत हे विचार करत आहोत की, गावाला कसं जायचं. आमच्या घरातील काही लोक गावाला पोहोचले आहेत. त्यांनी सांगितलं की, आम्ही कसे पोहोचलो हे आम्हालाच माहिती आहे. कारण रस्त्यांची अवस्था खूप बिकट आहे, असं त्यांनी म्हटलं.
जेव्हा अडीच वर्षे आमचं सरकार सत्तेत होतं. तेव्हा हेच लोक मुंबई गोवा हायवे रस्त्यावरून टीका करत होते. आज तुम्ही काय करताय? तुमच्या सरकारलाही एक वर्ष झालं ना… तुम्हीही हा रस्ता नीट करू शकला नाहीत. तुम्ही राज्याचा काय विकास करणार आहात, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे सरकारला टोला लगावला आहे.