अध्यक्षपदावरून पायउतार, कार्यकर्त्यांची चार दिवस विनवणी, अखेर निर्णय मागे; पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले…
Sharad Pawar on NCP Chief : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच! राजीनामा मागे घेताना म्हणाले...
मुंबई : तारीख होती 2 मे. वार होता मंगळवार आणि प्रसंग होता शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या पुर्नप्रकाशनाचा. हा दिवस राष्ट्रवादीच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा होता. सगळीकडे लगबग सुरू होती ती पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याची. पुस्तकाचं प्रकाशन झालं. शरद पवार बोलायला उभे राहिले. राजकीय कारकीर्दीविषयी बोलले. पुढे पुस्तक प्रकाशनावर भाष्य केलं अन् याच प्रसंगी त्यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याचं शरद पवार यांनी घोषित केलं अन् एकच खळबळ उडाली.
राष्ट्रवादीचे नेते-कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या पायाशी बसले अन् पक्षाच्या अध्यक्षपदी आपणच राहावं, अशी विनंती केली. त्यानंतर मागचे चारदिवस अशी मागणी करण्यात आली आंदोलनं झाली अन् शरद पवार यांनी आपला निर्णय अखेर मागे घेतला.
आज पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी आपण निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं. तेव्हा ते विविध मुद्द्यांवर बोलले.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
लोक माझ्या सांगाती या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशन समारंभाच्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सामाजिक जीवनातील प्रदीर्घ प्रवासानंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती. पण मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसात तीव्र भावना उसटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझे सांगाती असलेले जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक माझ्यावर विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होवून एकमुखाने मला आवाहन केलं. त्याचबरोबर जनमनातून, विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षाचे सहकारी आणि कार्यकर्ते मी अध्यक्ष होण्याची जबाबदारी घ्यावी अशी विनंती केली, असं शरद पवार म्हणाले
लोक माझ्या सांगाती हे माझ्या सामाजिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडे जवभावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेलं आवाहन तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीमुळे, या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आला. या सर्वांचा विचार करुन मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे, या निर्णयाचा मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे, असं म्हणत आपण निर्णय मागे घेत असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं.
माझी जबाबदारी नैतिक अशी होती. मी सर्वांना विश्वासात घेतलं असतं तर त्यांनी परवानगी दिली नसती. पण मी त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं, हे मी मान्य करतो. राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया उमेटल हे माहिती होती. पण इतकी तीव्र प्रतिक्रिया उमेटल असं वाटत नव्हतं, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.