‘बेटी बचेगी, तभी तो पढेगी’, हे विसरू नका!; मणिपूरमधील व्हायरल व्हीडिओवरून सुप्रिया सुळे आक्रमक

| Updated on: Jul 25, 2023 | 1:16 PM

Supriya Sule on Manipur Violence Viral Video : मणिपूरमधील व्हायरल व्हीडिओ प्रकरणी राष्ट्रवादीकडून 'मौन निषेध'; सुप्रिया सुळेही आक्रमक; वाचा...

बेटी बचेगी, तभी तो पढेगी, हे विसरू नका!; मणिपूरमधील व्हायरल व्हीडिओवरून सुप्रिया सुळे आक्रमक
Follow us on

मुंबई | 25 जुलै 2023 : मणिपूरमधील एका व्हीडिओमुळे देशभर खळबळ उडाली आहे. दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली आहे. त्यावरून देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘बेटी बचेगी, तभी तो पढेगी’, हे विसरू नका, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या वतीने मुंबईत ‘मौन निषेध’ नोंदवण्यात आला आहे.

सुप्रिया सुळे यांचं ट्विट जसंच्या तसं

लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत मणिपूर येथे महिलांवर होत असलेल्या अनन्वित अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला. देशभरात आरक्षण हा संघर्षाचा विषय झाला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका असो की मणिपूर येथील वांशिक हिंसाचार, यामागे आरक्षणाचाच मुद्दा आहे. मणिपूर येथील हिंसाचारात जून महिन्यात १४२ जणांचा मृत्यू झाल्याचा सरकारी आकडा आहे.

जुलै संपत आला तरी हा हिंसाचार थांबवण्याचे नाव घेत नाही. जवळपास ५४ हजार लोक विस्थापित झाले असून अनेकांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. येथील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. देशाचा जगभरात गौरव वाढविणारी बॉक्सर मेरी कॉमच्या राज्यात महिलांप्रती झालेला हिंसाचार अतिशय गंभीर बाब आहे. महिलांना सरेआम गोळ्या मारल्या जात आहेत. त्यांच्यावर बलात्कार होत आहेत.

महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर मणिपूर येथील हिंसाचाराबाबत सरकारला तातडीने कारवाई करावी लागली. सरकारने देखील हा व्हिडिओ जास्त पसरु नये यासाठी प्रयत्न केले. तपास यंत्रणांना देखील गुन्हे दाखल करुन आरोपींना गजाआड करण्यासाठी ७७ दिवस लागले. हा संघर्ष सोडविण्यासाठी केंद्र सरकारने नेमके काय प्रयत्न केले याबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.

ज्या भागात वांशिक हिंसाचार उसळला आहे त्या भागातील महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तसेच तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने योग्य नियोजन करण्याची गरज आहे. मणिपूरला निर्भय महिलांचा वारसा आहे हे आपण विसरता कामा नये. त्यांच्या सोबत उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. ‘बेटी बचेगी, तभी तो पढेगी’ हे विसरता कामा नये.

राष्ट्रवादीकडून निषेध

राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी’मौन निषेध’ नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्यासमोर केंद्र सरकार विरोधात पक्षातर्फे ‘मौन निषेध’ नोंदवला गेला.

मणिपूरमधील महिलांवर झालेल्या राक्षसी अत्याचाराचा धिक्कार असो..!, असं ट्विट करत राष्ट्रवादीकडून ही माहिती देण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादीच्या मुंबई कार्याध्यक्षा राखी जाधव, मुंबई पदाधिकारी रुपेश खांडके, मुंबई महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई अल्पसंख्यांक अध्यक्ष सोहेल सुभेदार, मुंबई हिंदी भाषिक अध्यक्ष मनिष दुबे, युवक प्रदेश पदाधिकारी अमोल मातेले आणि कुलाबा तालुका अध्यक्ष मनोज आमरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.