मुंबई : राष्ट्रवादी पक्षात सध्या दोन गट पडलेत. एक शरद पवार यांचा तर दुसरा अजित पवार यांचा. काल या दोन्ही गटांनी बैठकींचं आयोजन केलं होतं. शरद पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठक बोलावली होती तर अजित पवार यांनी वांद्रेतील एमईटी या ठिकाणी आमदारांची बैठक बोलावली होती. यशवंतराव चव्हाण सेंटरला झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषण केलं. या भाषणात संघर्षाच्या काळात आपण वडिलांसोबत असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. त्यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. खोटारडेपणाचा आरोपही निलेश राणे यांनी केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण ऐकून असं वाटतं की लहानपणी जेव्हा आपल्याला टीचर वडिलांवरती एक पान लिहायला सांगायची, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळेंकडे स्वतःच्या वडिलांबद्दल सांगण्या पलीकडे काही नाही.
जास्त हसून बोलणारी लोकं ही नेहमी खोटारडी असतात हे आजपर्यंतचा जाणवलं म्हणून खासदार सुळे जेवढ्या बोलतील तितकं त्यांच्या विरोधकांना चांगलंच आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण ऐकून असं वाटतं की लहानपणी जेव्हा आपल्याला टीचर वडिलांवरती एक पान लिहायला सांगायची, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळेंकडे स्वतःच्या वडिलांबद्दल सांगण्या पलीकडे काही नाही.
जास्त हसून बोलणारी लोकं ही नेहमी खोटारडी असतात हे आजपर्यंतचा जाणवलं म्हणून…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 6, 2023
माझ्यासाठी कविता लिहिली गेली की, श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी, माझा बाप बुलंद कहाणी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. एकप्रकारे आपण आरपारच्या लढाईसाठी आपण मैदानात उतरल्याचं त्यांनी विरोधकांना सांगितलं.
यशवंतराव चव्हाण सेंटरला झालेल्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी जोरदार भाषण केलं. यात त्यांनी शरद पवारांच्या सोबत आपण खंबीरपणे उभं असल्याचं सांगितलं. तसंच अजित पवार यांच्या टीकेलाही उत्तर दिलं.
मी महिला आहे. थोडं काही बोललं तरी टचकन डोळ्यात पाणी येतं . पण जेव्हा संघर्षांची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच महिला अहिल्या होते, तीच ताराराणी होते आणि तीच जिजाऊ होते. ही लढाई एका व्यक्ती विरोधात नाही , तर भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीविरोधात आपला लढा आहे. ही लढाई विचारांची आणि तत्वांची आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
रतन टाटा या वयातही काम करतात. वयाची 80 वर्ष उलटल्यानंतरही अमिताभ बच्चन हे जाहिरातीत आणि मोठ्या पडद्यावर दिसतात, असा दाखला देत अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. आपल्या वडिलांना म्हणायचं की, तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद द्या ,असं म्हणणाऱ्या पोरांपेक्षा आम्ही मुलीच चांगल्या, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.