मुंबई : “जेव्हा आदित्य ठाकरे अयोध्येला प्रभू रामाच्या दर्शनासाठी गेले होते. तेव्हाच या आमदारांना तिकडं ठेवून घ्यायचं असं ठरलं होतं. आमदारांना घेऊन तिथंच राहायचं. अन् बंड करायचं असं त्यांचं ठरलं होतं. तिकडं जायचं ठरलं होतं. तेव्हा एका आमदाराने माझं तिकीट सुद्धा काढलं होतं. पण नंतर निरोप आला की तो दौरा रद्द झाला म्हणून…. नाही तर तेव्हाच बंड झालं असतं. तशी कुणकुण मला लागली होती, मात्र आमदारांना सोबत न नेल्यानं तो प्लॅन फसला”, असं ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितलं आहे.
अभिनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आदेश बांदेकर यांनी अकोला-बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आणि धाराशिवचे आमदार कैलास घाडगे-पाटील यांची मुलाखत घेतली. यात नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांनी मोठे खुलासे केले आहेत. याआधीच बंड झालं असतं असं देशमुखांनी सांगितलं आहे.
बंडखोरीनंतर आमदारांना जेव्हा सूरतला नेण्यात आलं तेव्हा नेमकी काय परिस्थिती होती, त्यावरही नितीन देशमुख यांनी भाष्य केलंय. आम्ही सूरतला पोहोचलो. तिथे प्रचंड बंदोबस्तात आमदारांना ठेवण्यात आलं होतं. एवढा मोठा पोलीस बंदोबस्त होता. ते बघून आम्हीही चक्रावलो होतो. तिथं जवळपास 10 आयपीएस अधिकारी होते. ते फाईव्ह स्टार हॉटेल पोलिसांनीच घेरलेलं होतं. हे सगळं नियोजित होतं, असं नितीन देशमुख यांनी सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे यांनाच मी सांगितलं की, हे असं पळणं मला पटत नाहीये. तुम्हाला राष्ट्रवादीसोबत राहायचं नसेल, तर तसं सांगा. आपण मातोश्रीवर जाऊ तिथं जाऊन चर्चा करूयात. मग शिंदेसाहेबांनी मला हॉटेलच्या बाहेर आणलं. पुढच्या चौकापर्यंत ते माझ्यासोबत होते. मग मी पळू लागलो तर मग अरविंद सावंत यांना फोन केला, असं नितीन देशमुख यांनी सांगतलं.
देवेंद्र फडणवीस माध्यमांसमोर सांगतात की मी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं.पण फडणवीसांना सत्तांतर होणार हे माहिती होतं. पण मुख्यमंत्री कोण होणार हे माहिती नव्हतं. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांना फक्त माहिती होतं की मुख्यमंत्री होणार ते, असा खुलासाही नितीन देशमुख यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि सहा महिन्यातच सत्ता बदल करण्याच्या आणि बंडखोरीच्या तयारीला सुरूवात झाली, असंही नितीन देशमुख म्हणालेत.