मुंबई-पुणे ते नागपूर-चंद्रपूर, कोणत्या शहराचं महापौरपद कोणाकडे?
मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक यासारख्या महापालिकांच्या महापौरपदांची निवडणूक पार पडलेली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापने तिढा अद्याप सुटलेला नाही. त्याच वेळी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक यासारख्या महापालिकांच्या महापौरपदांची निवडणूक पार पडलेली आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप सत्तास्थापनेपासून दूर दिसत आहे. परंतु मुंबई वगळता बहुतांश महापौरपदांवर भाजपचे उमेदवार विराजमान झाले (Mayor Elections in Maharashtra) आहेत.
मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर विराजमान झाल्या आहेत. भाजपने आधीच माघार घेतल्यामुळे किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपमहापौरपदी सेनेच्याच सुहास वाडकर यांची निवड झाली आहे. विरोधकांना परखड उत्तर देणाऱ्या नेत्या अशी किशोरी पेडणेकर यांची ओळख आहे.
पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांची निवड झाली. मोहोळ यांना 97 मतं मिळाली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश कदम यांना 59 मतं पडली. शिवसेनेने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे पुणे महापौरपदाच्या निवडणुकीत महासेनाआघाडी पाहायला मिळाली.
उल्हासनगर महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. कारण महासेनाआघाडीच्या बळावर शिवसेनेच्या उमेदवार लीलाबाई आशन महापौर झाल्या. आशान यांना टीम ओमी कलानी आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला.
पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपच्या उषा उर्फ माई ढोरे यांची निवड झाली. त्यांना 81 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती उर्फ माई काटे यांना 41 मतं पडली. पुण्यासोबतच पिंपरीतही ‘महासेनाआघाडी’ची एकी होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमहापौरपदाचे उमेदवार राजू बनसोडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे भाजपच्या तुषार हिंगे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे.
नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत अनोखे ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळाले. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी पुन्हा पक्षाला संकटातून तारत महापौरपद राखण्यास मदत केली. त्यामुळे नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी बिनविरोध निवडून आले आहेत. नाशिकमध्ये मात्र महासेनाआघाडीत ‘महा’फूट पडल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेला मतदान करण्याचा व्हीप बजावूनही काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या गळाला लागले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे सतीश कुलकर्णी हे नाशिकचे 16 वे महापौर ठरले आहेत.
नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या संदीप जोशी यांची निवड झाली आहे. भाजपच्या संदीप जोशी यांना 104 मतं, तर काँग्रेसच्या हर्षदा साबळे यांना 26 मतं मिळाली. शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तर भाजपच्या मनिषा कोठे यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. कोठे यांना 104 मते मिळाली, तर दिनेश्वर पेठे (राष्ट्रवादी) यांना 26 मतं आणि मंगला लांजेवार (बसप) यांना 10 मतं मिळाली.
चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या उमेदवार राखी कंचर्लावार यांची निवड झाली. कंचर्लावार यांना 42 मतं, तर काँग्रेस उमेदवार कल्पना लहामगे यांना 22 मतं मिळाली. 2 नगरसेवक अनुपस्थित राहिले होते. तर उपमहापौरपदी भाजपच्या राहुल पावडे यांचा विजय झाला. पावडे यांना 42 तर काँग्रेसच्या अशोक नागापुरे यांना 22 मतं मिळाली. भाजपने आपला सत्तागट कायम राखण्यात यश मिळवलं. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची निकराची लढाई सफल झाल्याचं दिसतं.
अमरावतीच्या महापौरपदी भाजपचे चेतन गावंडे तर उपमहापौरपदी भाजपच्या कुसुम साहू यांची निवड झाली. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रदीप हिवसे यांचा पराभव झाला.
अकोला महापालिकेत पुन्हा भाजपच्या महापौराची सत्ता आली आहे. अकोल्याच्या महापौरपदी भाजपच्या अर्चना मसने, तर उपमहापौरपदी भाजपचे राजेंद्र गिरी विजयी झाले आहेत.
लातूरचं महापौरपद आता भाजपकडून काँग्रेसकडे गेलं आहे. काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे लातूरचे नवीन महापौर झाले आहेत. भाजपच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेसला मतदान केलं. भाजप 35 तर काँग्रेस 34 असं पक्षीय बलाबल होतं. काँग्रेसचा एक नगरसेवक अनुपस्थित राहिला, तर भाजपच्या एका नगरसेवकाच्या मृत्यूमुळे जागा रिकामी होती. भाजपचे दोन नगरसेवक फोडून काँग्रेसने पालिकेवर ताबा मिळवला.
महापौरांवर एक नजर (Mayor Elections in Maharashtra)
मुंबई – किशोरी पेडणेकर (शिवसेना), उपमहापौर – सुहास वाडकर (शिवसेना) पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप), उपमहापौर – सरस्वती शेंडगे (भाजप) पिंपरी चिंचवड– उषा उर्फ माई ढोरे (भाजप), उपमहापौर – तुषार हिंगे (भाजप) नाशिक – सतीश कुलकर्णी (भाजप), उपमहापौर – भिकू बाई बागुल (भाजप) उल्हासनगर – लीलाबाई आशन (शिवसेना) – महासेनाआघाडी नागपूर – संदीप जोशी (भाजप), उपमहापौर – मनिषा कोठे (भाजप) चंद्रपूर – राखी कंचर्लावार (भाजप), उपमहापौर – राहुल पावडे (भाजप) अमरावती – चेतन गावंडे (भाजप), उपमहापौर – कुसुम साहू (भाजप) अकोला – अर्चना मसने (भाजप), उपमहापौर – राजेंद्र गिरी (भाजप) लातूर – विक्रांत गोजमगुंडे (काँग्रेस), उपमहापौर – चंद्रकांत बिराजदार (भाजप बंडखोर काँग्रेसच्या पाठिंब्यावर) परभणी – अनिता सोनकांबळे (काँग्रेस), उपमहापौर – भगवान वाघमारे (काँग्रेस)
आतापर्यंत
ठाणे – नरेश म्हस्के (शिवसेना), उपमहापौर – पल्लवी कदम (शिवसेना) कोल्हापूर – सूरमंजिरी लाटकर (राष्ट्रवादी), उपमहापौर – संजय मोहिते (काँग्रेस) – महासेनाआघाडी
संबंधित बातम्या :
संकटमोचकांची किमया, नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी बिनविरोध
शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौरपदी विराजमान
Mayor Elections in Maharashtra