Shivsena News : शिंदे गटकडून ठाकरे गटाच्या खासदारांना नोटीस; ‘या’ कृतीवर ठेवलं बोट
Rahul Shewale on Shivsena Party Notice News : शिंदे गटकडून ठाकरे गटाच्या खासदारांना नोटीस; कारण काय? शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाच्या खासदारांवर हल्लाबोल केलाय. कायदेशीर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.
नवी दिल्ली | 27 सप्टेंबर 2023, संदीप राजगोळकर : शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या खासदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशन काळामध्ये ठाकरे गटाच्या खासदारांनी व्हीप नाकारल्याचा ठपका शिंदे गटाकडून ठेवण्यात आला आहे. खासदार विनायक राऊत, राजन विचारे, संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांनी व्हीप नाकारल्याचा ठपका ठेवत शिंदे गटाकडून ही नोटीस देण्यात आली आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेची भूमिका मांडली. या खासदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं राहुल शेवाळे म्हणालेत.
याबाबत शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली आहे. खासदार भावना गवळी या आमच्या पक्षाच्या व्हीप आहेत. लोकसभा अध्यक्षांनी त्याला अधिकृत मान्यता दिली आहे. या नियुक्ती संदर्भात कोणत्याही कोर्टात केस सुरु नाहीये. नियुक्ती संदर्भात उच्च किंवा सर्वोच्च न्यायलयाने कोणतेही आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे आम्ही दिलेली नोटीस ही अधिकृत आहे, असं राहुल शेवाळे म्हणालेत.
देशाच्या हितासाठीजे निर्णय घेतले जातात. त्यासंदर्भात आम्ही व्हीप जारी करतो. आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. त्यांच्या आदेशानुसारच आम्ही व्हीप जारी केला होता. 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या काळात आम्ही व्हीप जारी केला होता. या काळात अत्यंत महत्वाची विधेयकं मांडली गेली. याच काळात ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक मांडलं गेलं. ते मंजूरही झालं. हे देशभरातील महिलांच्या दृष्टीने महत्वाचं विधेयक आहे. या विधेयकासाठी आम्ही व्हीप जारी केला होता मात्र तो काही खासदारांकडून पाळला गेला नाही. त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस पाठवली आहे, असं राहुल शेवाळे म्हणालेत.
बाळासाहेब ठाकरे यांनीही या महिला आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट केली होती. त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन एकनाथ शिंदे यांनी काम करत आहेत. त्यांनी आम्हाला आदेश दिला होता. या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करण्यासाठी व्हीप जारी करण्यास सांगितलं होतं. पण या खासदारांनी या विधेयकाच्या मतदानावेळी अनुपस्थिती दाखवली. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई करणा आहोत, असं राहुल शेवाळे म्हणालेत.
दरम्यान या नोटीशीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी हे आम्हाला काय व्हीप बजावणार?,असं म्हणत एका वाक्यात उत्तर दिलं. 2024 नंतर हे लोक कुठेच नसतील. आता असलेल्या पैकी एकही खासदार संसदेत नसेल .मुख्यमंत्र्यांसह एकही आमदार विधानसभेत नसेल. हे पक्कं आहे, असं संजय राऊत म्हणालेत.