मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं श्वानप्रेम सर्वश्रृत आहे. त्यांच्या घरातील कुत्र्यांवर ठाकरे कुटुंबियांचं विशेष प्रेम आहे. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. एक व्हीडिओ मनसेकडून शेअर करण्यात आला आहे. यात राज ठाकरे यांनी अंगावर शहारे आणणारा प्रसंग सांगितला आहे.
झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या रिअॅलिटी शोमध्ये राज ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. तिथे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अवधूत गुप्ते यांनी शर्मिला ठाकरेंविषयी प्रश्न विचारला. तेव्हा राज ठाकरेंनी उत्तर दिलं.
माझी पत्रकार परिषद होती. शर्मिला बेसिनजवळ चेहऱ्याला हात लावून उभी होती. तेव्हा तिला मी काय झालं असं विचारलं. पण तिला व्यवस्थित बोलता येत नव्हतं. मी खाली जमीनीवर पाहिलं तर सगळं रक्त सांडलं होतं. तेव्हा तिच्या गालावर जखमा होत्या. दोन्ही ओठांचे सहा तुकडे झाले होते, असं राज ठाकरे यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितलं.
मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात तिच्यावर उपचार झाले. लगेच तिच्यावर ऑपरेशन, प्लास्टिक सर्जरी एकाच वेळी केली. त्यामुळे ते निभावलं. एवढं सगळं होऊनही जेव्हा हॉस्पिटलमधून घरी आली तेव्हा घरात जाताना परत त्या बॉन्डला जवळ घेतलं. त्याला चुंबन दिलं आणि मग ती घरात गेली, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
शर्मिलाच्या घरी कधीही कुत्रा नव्हता. पण तिने आमच्या घरातील कुत्र्यांना जे प्रेम दिलं. जी माया दिली ती पाहता मलाही आश्चर्य वाटतं, असं राज ठाकरे म्हणाले.
संघर्षयोद्ध्याची सहचारिणी सौ. शर्मिला राज ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा ! ? pic.twitter.com/pQuETuRKTj
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) June 8, 2023
शर्मिला ठाकरे यांचं राज ठाकरे यांनी कौतुक केलंय. शर्मिलाची काही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. तिचे वडील हे निर्माते होते. नाटक आणि मनोरंजन क्षेत्राची तिची पार्श्वभूमी होती. तरिही तिने ज्या प्रकारे मला समजून घेतलं ते विशेष आहे. माझ्या राजकीय जीवनात, कौटुंबिक जीवनात जे काही घडत गेलं ते तिने समजून घेतलं. ते समजून घेणं खूप गरजेचं होतं, असं राज ठाकरे म्हणालेत.