संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार लागली नसती तर…; राज ठाकरे यांचं ट्विट चर्चेत
Raj Thackeray on New Parliament Building Inauguration ; नव्या संसदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; राज ठाकरे यांची ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया
मुंबई : आज नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. आज सकाळी सर्व धर्मीयांच्या प्रथा परंपरांप्रमाणे पूजा करण्यात आली. सेंगोलची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता संसद भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला विरोधकांनी विरोध केला. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांचं ट्विट
आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो…, असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.
आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं…
— Raj Thackeray (@RajThackeray) May 28, 2023
विरोधकांचं म्हणणं काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे उद्घाटन करू नये. राष्ट्रपती देशाचे प्रथम नागरिक असतात. त्यामुळे नव्या संसदेचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना करू द्यावं, अशी मागणी विरोधकांची कायम राहिली. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेचं उद्घाटन झालं.
राहुल गांधी यांचं ट्विट
उद्घाटन झाल्यावर आज राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. संसद जनतेचा आवाज आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत, असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
संसद लोगों की आवाज़ है!
प्रधानमंत्री संसद भवन के उद्घाटन को राज्याभिषेक समझ रहे हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 28, 2023
सुप्रिया सुळे म्हणाल्या…
लोकसभा, संसद आमच्यासाठी मंदिर आहे. संसदेची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते. एरवी बिल पास करायचे असतात तेव्हा मंत्री विरोधी पक्षातील नेत्यांना फोन करतात. मग जर सरकारने आता संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी या देशातील विरोधी पक्षातील नेत्यांना फोन केला असता तर सगळे गेले असते. हा कार्यक्रम कोणा एका व्यक्तीचा आहे का? , असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.