“शिवसेनेतील बंड आणि राष्ट्रवादीतील सध्याची स्थिती यात फरक, पवारसाहेब वेळेनुसार…”
Rohit Pawar on Ajit Pawar : अजित पवार यांचं बंड आणि शरद पवार यांचा निर्णय; रोहित पवार यांचं महत्वाचं वक्तव्य
मुंबई : अजित पवार भाजपसोबत जात सत्तेत सहभागी झाले. आता त्यांनी पक्षाची नवी कार्याकारिणीही जाहीर केली आहे. पक्ष आम्ही सोडलेला नाही. आम्ही राष्ट्रवादी पक्षातच आहोत. आमचा पक्ष राष्ट्रवादीच आहे, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या बंडाची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी होत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.
अजित पवार परत राष्ट्रवादीत येणार की आपलं बंड कायम ठेवणार? शरद पवार यांची पुढची भूमिका काय? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. त्यावर रोहित पवार यांनी भाष्य केलंय.
शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाची घटनात खूप फरक आहे. अजितदादा पवार यांनी शरद पवारसाहेबांसोबतच राहायला पाहिजे होते. पण अजूनही ती संधी आहे. बघू पुढे काय होतं ते. पण जे काही होणार आहे ते होणारच आहे. पण पुढे जे काही होईल. त्यावर शरद पवारसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला स्वीकारावं लागेल, असं रोहित पवार म्हणालेत.
काही दिवसातच विधिमंडळाचं अधिवेशन आहे. या अधिवेशनात आम्हाला सर्वसामान्यांचे, जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. आज माध्यमांसमोर सर्वच पक्षाचे नेते स्वत:चे प्रश्न मांडत आहेत. पण सध्या जनतेचे प्रश्न मांडले जाणं आवश्यक आहे. ते प्रश्न घेऊन मी विधानभवनात आलो होतो. लोकांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी लढणं हाच माझा लोकप्रतिनिधी म्हणून उद्देश आहे, असं रोहित पवार म्हणालेत.
शरद पवारसाहेबांना सर्वच आमदार संपर्क करत आहेत. जयंतराव पाटील, सुप्रियाताई सुळे हे सर्व आमदारांच्या संपर्कात आहेत. तसंच अजितदादा आणि त्यांच्याकडे असणारे नेतेही पवारांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आज कोण कुठे हे सांगता येणार नाही, असंही रोहित पवार म्हणालेत.
अजित पवार यांनी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यावर, गेल्यावेळी जे पत्र होतं. त्यावर माझी सुद्धा सही होती आणि ते पत्र म्हणजे अजित दादांना विरोधी पक्षनेता म्हणून नेमावं म्हणून ते पत्र होतं. पक्ष नेमका कुणाचा आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत असं होतच राहणार आहे. पण उद्यापर्यंत अनेक गोष्टी उघड होतील, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.