MIDC चा प्रश्न महत्वाचा आहेच पण सरकारने जरा ‘या’ प्रश्नाकडेही लक्ष द्यावं; रोहित पवार यांची मागणी काय? पाहा…
Rohit Pawar on Karjat MIDC : अमित ठाकरे माझे मित्र, त्यांना एवढंच सांगेन...; रोहित पवार यांनी काय सल्ला दिला?
मुंबई | 25 जुलै 2023 : कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काल विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं. विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रोहित पवार हे उपोषणाला बसले होते. कर्जत तालुक्यातील पाटेवाडी गावात MIDC येणार आहे. पण राजकीय कारणातून सरकार हा जीआर काढत नसल्याचं त्याचं म्हणणं आहे. या संदर्भात त्यांनी काल आंदोलन केलं.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रोहित पवार यांची भेट घेत आज बैठक बोलावली जाईल, असा शब्द दिला. त्यानंतर रोहित यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. आज ही बैठक होणार आहे. त्या बैठकी आधी रोहित पवार यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला तेव्हा एमआयडीसी सोबतच आणखी एका प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेढलं आहे.
आता थोड्याच वेळामध्ये ही बैठक होणार आहे. काल मी आंदोलनाला बसलो होतो. त्या संदर्भातला निर्णय जो आहे काही वेळात होईल आणि मग आम्ही याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असं रोहित पवार म्हणालेत.
याकडेही लक्ष द्या…
एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पोलीस कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आता राज्यात भरती केली जात आहे. तर हे अत्यंत चुकीचं हा घोटाळ्याचा प्रकार आहे. याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरी देता कामा नये. अन्यथा हा पायंडा पडेल. अग्निवीरांसारखं हा प्रकार आहे आणि हा चुकीचा पायंडा जर पडला त्याला सरकार जबाबदार राहील, असं रोहित पवार म्हणालेत.
अमित ठाकरे यांना सल्ला
टोलनाक्यांच्या तोडफोडीवरून मनसे आणि भाजपमध्ये जुंपली आहे. त्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत. ते युवा नेता आहेत. माझं त्यांना एवढेच म्हणणं आहे की टोलनाके तोडण्याआधी त्यांनी एकदा तरी विचार करावा की आपल्याला भविष्यामध्ये लोकांना काय द्यायचं आहे. भाजप जर अशा पद्धतीने टीका करत असेल तर ती त्यांना टार्गेट करतेय, असं माझं म्हणणं आहे. पण अमित ठाकरे यांनी देखील या सगळ्या तोडफोडीबद्दल एकदा तरी विचार करायला हवा, असं रोहित पवार म्हणालेत.
मुंबई महानगरपालिका म्हणजे यांची मक्तेदारी झाली का? काही निर्णय घेतात. कुणी येतंय. तिकडे जाऊन बसतंय. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना का ऑफिसची कमी आहे का? ते स्वतः बिल्डर आहेत. ते कुठेही ऑफिस घेऊ शकतात. महानगरपालिकेत असताना केबिन का हवी आहे?, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.