जय मोदींचा, श्रेय तपास यंत्रणांचे!; चार राज्यांच्या निकालावरून संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
Saamana Editorial on Assembly Election Results 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यांवर भाजपने ताबा मिळविला, पंतप्रधान, गृहमंत्री, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचे 'टीमवर्क' कामी आलं, असं म्हणत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर घणाघात करण्यात आला आहे.
मुंबई | 04 डिसेंबर 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल काल लागला. यात मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपचा विजय झाला. यावर आजच्या सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. ‘जय मोदींचाच; पण श्रेय कुणाला?’ शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यातून भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर टीका करण्यात आली आहे. ‘जय मोदींचा , श्रेय तपास यंत्रणांचे’ अशीच भाजपच्या तीन राज्यांतील विजयाची घोषणा हवी, असं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.
सामना अग्रलेख जसाच्या तसा
भारतीय जनता पक्षा नेत्यांच्या विजयाचा जल्लोष जरूर करावा, पण स्वतः च्या कार्यालयाबरोबरच केंद्रीय तपास यंत्रणांच्या दाराबाहेरही विजयाचे फटाके फोडावेत. ऐन निवडणुकीत मतदान सुरू असताना तपास यंत्रणा भाजपसाठी राज्या राज्यांतील विरोधकांवर धाडी घालून बदनामीचे प्रचार तंत्र राबवीत होत्या . त्यामुळे ‘ जय मोदींचा , श्रेय तपास यंत्रणांचे ‘ अशीच भाजपच्या तीन राज्यांतील विजयाची घोषणा हवी. लोकशाहीत जनमताचे कौल स्वीकारायचे असतात. मग लोकशाही असो किं वा नसो!
तेलंगणाच्या जनतेने के. सी. आर. यांना धडा शिकवला, पण त्यांनी तेथे भाजपला स्वीकारले नाही. काँग्रेसचा पर्याय निवडला. भाजपला तेलंगणात दहा जागांचा टप्पाही गाठता आला नाही. मुख्य म्हणजे ओवेसी यांच्या एमआयएमचे भाजपधार्जिणे राजकारणही तेलंगणात चालले नाही. तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. मध्य प्रदेश, राजस्थान या मोठय़ा राज्यांवर भाजपने ताबा मिळविला. पंतप्रधान, गृहमंत्री, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचे ‘टीमवर्क’ कामी आले व भाजपने विजय मिळवला.
क्रिकेटचा विश्वचषक भारतात झाला. भारतीय संघाने उत्तम खेळ व मेहनत करूनही विश्वचषक ऑस्ट्रेलियाकडे गेला म्हणून भारतीय संघाच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. काँग्रेस पक्षाने ‘इंडिया आघाडी’ म्हणून टीमवर्क केले असते तर कामगिरीत अधिक चमक दिसली असती, पण चुका झाल्या आहेत. त्यातून धडा घेऊन 2024 च्या तयारीस लागायला हवे. मध्य प्रदेश, राजस्थान जिंकण्यासाठी भाजपने केंद्रातल्या मंत्र्यांना निवडणुकीत उतरवले, पण काँग्रेसने राज्यातील ‘इंडिया’ आघाडीच्या सहकाऱ्यांना सोबतीला घेतले नाही.
मध्य प्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गेहलोत, छत्तीसगडात भूपेश बघेल याच वतनदारांना पुढे केले. तेलंगणात असा कोणताही चेहरा नव्हता. त्यामुळे लोकांनी के. सी. आर. यांना बदलून काँग्रेसला संधी दिली. काँग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमजोर झाली.
भारतीय जनता पक्षाने त्यांच्या विजयाचा जल्लोष जरूर करावा, पण स्वतःच्या कार्यालयाबरोबरच केंद्रीय तपास यंत्रणांच्या दाराबाहेरही विजयाचे फटाके फोडावेत. ऐन निवडणुकीत मतदान सुरू असताना तपास यंत्रणा भाजपसाठी राज्याराज्यांतील विरोधकांवर धाडी घालून बदनामीचे प्रचार तंत्र राबवीत होत्या. त्यामुळे ‘जय मोदींचा, श्रेय तपास यंत्रणांचे’ अशीच भाजपच्या तीन राज्यांतील विजयाची घोषणा हवी. लोकशाहीत जनमताचे कौल स्वीकारायचे असतात. मग लोकशाही असो किंवा नसो!