मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून नव्या संसदभवनाच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. “नवे संसद भवन वादाचा विषय ठरत आहे. 2014 नंतर ‘भारत’ निर्माण झाला असे ज्यांना वाटते त्यांचे हे नवे संसद भवन त्याला इतिहास नाही. नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हाचे भारतमंत्री लॉर्ड मोर्ले यांच्याशी घटनात्मक सुधारणांची चर्चा करण्यासाठी पार्लमेंट कार्यालयात जात तेव्हा त्या इमारतीत चालताना इतिहास आपल्या बाजूने चालत आहे अशी त्यांची भावना होत असे. नव्या संसद भवनाच्या लॉबीत चालताना असे वाटेल? इतिहास 2014 नंतर थांबलाय”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
दिल्लीत नव्या संसद भवनाचे जोरदार उद्घाटन झाले. त्या सोहळ्यात राज्यघटनेचे, राजधर्माचे पालन झाले नाही.. ‘सन्गोल’ म्हणजे राजदंडाचे आगमन दिल्लीत झाले. राजदंडासमोर पंतप्रधान मोदी यांनी साष्टांग दंडवत घातल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. ‘सन्गोल’ हे राजेशाही म्हणजे बादशाहीचे प्रतीक आहे. याचा अर्थ पंतप्रधान मोदी यांना राज्यघटना बाजूला करून देशाचे राजे व्हायचे आहे काय? असा प्रश्न अनेकांनी विचारला, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
पराक्रमी व साहसी ? मोदी व शहा हे दोन्ही नेते पराक्रमी आणि हिमतीचे आहेत असे सांगितले जाते, पण पोलीस, केंद्रीय तपास यंत्रणा हाताशी नसतील तर या सगळ्यांच्या हिमतीचे बुडबुडे फुटतील. कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. त्यानंतर दिल्लीत नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाले. मोदींच्या सरकारला याच काळात नऊ वर्षे पूर्ण झाली, पण गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मोदी हे पत्रकार परिषद घेत नाहीत. ते का बोलत नाहीत, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
देशाची स्थिती ही राज्यघटना व लोकशाहीला मारक आहे. नवी संसद देशाच्या इतिहासाची साक्षीदार खरेच आहे काय? नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हाचे भारतमंत्री लॉर्ड मोर्ले यांच्याशी घटनात्मक सुधारणांची चर्चा करण्यासाठी पार्लमेंटमधील कार्यालयात जात, तेव्हा त्या इमारतीत चालताना इतिहास आपल्या बाजूने चालत आहे, अशी त्यांची भावना होत असे. हिंदुस्थानच्या जुन्या पार्लमेंटमध्ये चालताना भारतीय स्वातंत्र्य लढय़ाचा, राज्यघटना निर्मितीचा इतिहास आपल्या बाजूने चालत आहे असे नेहमीच वाटत आले! आता नवे संसद भवन उभे राहिले. 2014 नंतरच्या कोणत्या घटना सोबत चालतील तेवढेच पाहायचे!, असं म्हणत सामनातून मोदी सरकारवर घणघात करण्यात आला आहे.