मुंबई | 19 ऑगस्ट 2023 : 2014 ला देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. पुढे 2019 ला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा तर्क राजकीय वर्तुळातून लावण्यात येत होता. पण राज्यातील परिस्थिती बदलली. शिवसेना आणि भाजपची युती तुटली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मागच्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, अशी चर्चा असतानाच मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली अन् देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्विकारावं लागलं. त्यांना राजकीय कारकीर्दीत एक पायरी खाली यावं लागलं. त्यावरच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलंय. फडणवीस, सांभाळा!, या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.
देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले.
त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. ‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांडय़ा जात आहेत. फडणवीस, सांभाळा!
झोपलेल्यांना जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेऊन पडलेल्यांना जागे कसे करायचे, हा प्रश्न नेहमीच असतो. महाराष्ट्रात सध्या हा प्रश्न निर्माण झाला आहे तो भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत. एक आपले मुख्यमंत्री, ते सहसा झोपत नाहीत. दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस, ते सदैव अर्धग्लानी अवस्थेत आहेत. ”मी पुन्हा येईन, असे म्हणालो होतो. बोलल्याप्रमाणे तसेच झालेही होते, परंतु काही लोकांनी गद्दारी केली तरीही मी आलोच,” असे श्री. फडणवीस यांनी पुनः पुन्हा, पुनः पुन्हा सांगितले आहे. ही त्यांची अर्धग्लानी अवस्था आहे.
गेल्या वर्षभरात त्यांचे हे ‘पुनः पुन्हा’ प्रकरण इतक्या वेळा झाले आहे की, जनतेच्या शब्दकोशातून ‘पुन्हा’ हा शब्द बाद होण्याची शक्यता आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार होते, पण त्यांच्या हायकमांडने त्यांना ‘उप’ म्हणून पुन्हा पाठवले. आज हे ‘उप’ एका अननुभवी, बेइमान, भ्रष्ट माणसाच्या हाताखाली काम करीत आहेत. मी येणारच होतो, पण काही लोकांनी बेइमानी केली म्हणून मध्येच लटकलो, पण तरीही आलो. या त्यांच्या बोलण्यात इमानदारीचा जोश नाही. आता 2019 साली बेइमानी कोणी केली, हे महाराष्ट्र जाणतो. फडणवीस व त्यांचा पक्ष अर्धग्लानीत असला तरी महाराष्ट्राची जनता झोपेत नाही.
बेइमानी केली ती भाजपच्या सध्याच्या दिल्लीश्वरांनी. सत्तेचे वाटप समसमान करण्याचा शब्द देऊन तो फिरवण्यात आला व श्री. फडणवीस हे त्याचे साक्षीदार आहेत. ही बेइमानी तेव्हा झाली नसती तर महाराष्ट्रात फडणवीस सन्मानाने पुनः पुन्हा आलेच असते आणि फौजदाराचा जमादारही झाला नसता हे सत्य ‘प्यारे’ फडणवीस नाकारू शकत नाहीत. 2019 च्या बेइमानीमुळेच शिवसेना-भाजपची युती तुटली. 2014 सालात या
भाजपने रोवली याचा खुलासा श्री. एकनाथ खडसे यांनी केलाच आहे. त्यामुळे ज्या काही बेइमान लोकांमुळे फडणवीस 2019ला येऊ शकले नाहीत ते सर्व बेइमान त्यांच्याच घरात आहेत. श्री. फडणवीस म्हणतात, ”पहा, मी पुन्हा आलो.” हे सत्य नाही. ते अजिबात आलेले नाहीत, तर दिल्लीने त्यांचे राजकीय श्राद्ध घालण्याचा प्रयोग केला. फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी, कर्तबगार नेत्याला ‘बिनपगारी उपअधिकारी’ करून टाकले. त्यामुळेच महाराष्ट्रात सर्वच बाबतीत व क्षेत्रांत चिंतेची स्थिती निर्माण झाली.
भ्रष्टाचाराचे, महिलांवरील अत्याचाराचे आरोप असलेले लोक फडणवीस यांचे मंत्रिमंडळातील सोबती आहेत व या महान ‘उप’ महोदयांना गटारगंगेस अत्तराची नदी म्हणावे लागत आहे. हे असे पुन्हा पुन्हा येणे दुश्मनाच्या नशिबीही नसावे. महाराष्ट्राची लूट सुरू आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश विधानसभा अध्यक्ष पाळायला तयार नाहीत, पोलिसांचा वापर गुंडांच्या रक्षणासाठी सुरू आहे, जागोजागी लोकांचे बळी जात आहेत. पुन्हा पुन्हा ‘उप उप उप’ म्हणून आलेल्यांच्या नजरेसमोर हे घडत आहे. देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले.