मराठा समाजावर अमानुष लाठीहल्ला, गोळीबाराचे आदेश देणारा जनरल डायर कोण?; संजय राऊत यांच्या निशाण्यावर कोण?
Saamana Editorial on Jalna Antarwali Maratha Samaj Andolan Violence : मराठा समाजाचं उपोषण चिरडण्याचे आदेश देणाऱ्या जनरल डायरवर कारवाई करण्याची हिंमत मिंध्यांकडे आहे काय?; संजय राऊत यांचा सामनातून सवाल, वाचा सविस्तर...
मुंबई | 04 सप्टेंबर 2023 : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. याचा निषेध म्हणून ठिकठिकाणी बंद पुकारण्यात येत आहे. अशातच या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले? हा लाठीचार्ज का करण्यात आला? यावरच आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यात जालन्यात मराठा समाजावर अमानुष लाठीहल्ला, गोळीबाराचे आदेश देणारा जनरल डायर कोण?, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा
महाराष्ट्रातील मराठा, धनगर व अन्य काही समाज सातत्याने आरक्षणासाठी आंदोलने करत आहेत. मराठा समाजाने तर शांततेच्या मार्गाने लाखोंचे मोर्चे काढले. एक ठिणगी कुठे पडली असती तर वणवा पेटायला वेळ लागला नसता.
पण मराठा आंदोलक सदैव संयम बाळगूनच आंदोलने करत असताना आंतरवाली सराटीत पोलिसांचा फौजफाटा घुसवून जालियनवाला बाग घडवण्याचे फर्मान फोनवरून कोणी सोडले? आंतरवालीत अमानुष लाठीहल्ला व गोळीबाराचे आदेश देणारा जनरल डायर कोण? याचा छडा लागलाच पाहिजे!
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या न्याय्य मागणीची तड तर लागत नाहीच; पण या मुद्दय़ावरून आंदोलन करणाऱ्यांवर अमानुष लाठीहल्ला व गोळीबार करून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे राक्षसी कृत्य राज्यातील मिंधे-फडणवीसांच्या ट्रिपल इंजिन सरकारने केले आहे.
जालना जिल्हय़ातील आंतरवाली सराटी या गावात जे घडले ते चीड आणणारे आहे. अतिरेकी वा नक्षलवाद्यांवर हल्ला चढवावा अशा पद्धतीने पोलिसांनी चहुबाजूने घेरून मराठा आंदोलकांवर अमानुष हल्ला चढवला. पोलिसांनी केलेला लाठीहल्ला इतका बेछूट होता की, आपण निरपराध महिला, मुले व वयोवृद्धांची डोकी फोडतोय, याचेही भान पोलिसांना राहिले नाही.
स्वातंत्र्यलढय़ात अमृतसरमध्ये ब्रिटिशांनी जसे जालियनवाला बागेचे हत्याकांड घडवले, त्याच घटनेची आठवण व्हावी असा हा राक्षसी हल्ला होता. पोलिसांनी आंतरवालीमध्ये बळाचा जो अतिरेकी वापर केला, तो पाहता राज्यातील मिंधे सरकारला व फडणवीसांच्या गृहखात्यालाच मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून महाराष्ट्रात पेटवापेटवी करायची आहे काय? असा प्रश्न शांततेने आंदोलन करणाऱया मराठा समाजाला व महाराष्ट्राच्या जनतेलाही पडला आहे.
आंतरवालीच्या घटनेनंतर झालेला उद्रेक पाहून सटपटलेल्या सरकारने आता जालन्याच्या पोलीस प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवले; पण या प्रकरणात पोलिसांपेक्षा अधिक दोष उपोषण चिरडण्याचे आदेश देणाऱ्या जनरल डायरचा आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत मिंध्यांकडे आहे काय?