मोदींचा नऊ वर्षांचा कार्यकाळ म्हणजे जनतेच्या नाकी नऊ आलेला कालखंड; सामनातून शाब्दिक हल्ला
Saamana Editorial on PM Naredra Modi : भारत म्हणजे एका व्यक्तीच्या हातात असलेला सेंगोल नव्हे!; सामनातून नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र
मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांचा नऊ वर्षांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ, नव्या संसद भवनाचं उद्घाटन अन् सेंगोल यावरून सामनातून टीका करण्यात आली आहे. “मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, काळा पैसा वाढला, रोजगार देण्याचे वचन फसले. या सगळया गोष्टींमुळे जगात भारताची मान उंच झाली असे मोदींच्या अंध भक्तांना वाटणे स्वाभाविक आहे. कारण त्यांच्या दृष्टीने ‘मोदी हाच भारत व भारत म्हणजेच मोदी’, पण प्रत्यक्षात हा प्राचीन देश म्हणजे एका व्यक्तीच्या हाती असलेला ‘सन्गोल’ म्हणजे राजदंड नाही”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
मोदींनी 28 तारखेस नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. त्यात राजदंडाचे प्रतीक बसवले ते स्वतःची राजेशाही स्थापित करण्यासाठी. आता या नव्या राजेशाहीमुळे जगात देशाची मान कशी उंचावली? भारत म्हणजे लोकशाहीची जननी आहे. ही जननी राजदंडात नाही. राजदंडातील राजधर्माचे पालन सध्या होत नाही, भ्रष्टाचाराला पाठीशी घातले जात आहे. अशा वेळी राजदंड काय करणार? मोदी यांची नऊ वर्षे म्हणजे देशाच्या, जनतेच्या नाकी नऊ आलेला कालखंड आहे. तो लवकर संपेल तेवढे बरे!, असं म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे.
मोदींमुळे जगात मान वाढला. म्हणजे कसा? अंध भक्तांनी मोदींविषयी अनेक कल्पित कथा पसरवल्या. मोदी हे नुकतेच ऑस्ट्रेलियात जाऊन आले. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी असे सांगितले की, मोदी हेच ‘बॉस’ आहेत, पण त्याच ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानातील पाच राज्यांतील विद्यार्थ्यांना व्हिसा नाकारला आहे. सात राज्यांवर निर्बंधच घातले. मोदी ‘बॉस’ असल्याचे हे लक्षण कसे मानायचे?, असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
जपानमध्ये ‘क्वॉड’ परिषद झाली. तेथे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन होते. मोदी भक्तांनी असे पसरवले की, मोदी यांच्या जागतिक प्रभावामुळे बायडेन प्रभावित झाले. त्यांनी मोदींना विचारलं, “तुम्ही इतकी वर्षे राष्ट्रीय राजकारणात कसे काय टिकलात? त्याचा मंत्र काय?” मुळात बायडेन यांचे वय 80 आहे व ते 1971 पासून अमेरिकेच्या सिनेटवर आहेत. त्यामुळे बायडेन मोदींकडे यशाचा मंत्र विचारतील हे शक्य नाही, पण भक्तांनी तसे पसरवले. बायडेन हे मोदींचे इतके फॅन बनले की, त्यांनी मोदींचा ऑटोग्राफ घेतला. हे असे घडले याची एक ओळीची बातमी अमेरिकेच्या मीडियात नाही. अशा बातम्या पसरवल्यामुळे पंतप्रधानांचे हसे होते हे भक्तांनी समजून घेतले पाहिजे, असंही सामनात म्हणण्यात आलंय.