मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारचे काम करण्याचे स्वातंत्र्य व अधिकार बहाल केले व मोदी सरकारने त्या स्वातंत्र्याच्या मुसक्या बांधून सर्वोच्च न्यायालयाचाही अवमान केला. मोदी विश्वगुरू आहेत.’पापुआ’ देशाचे पंतप्रधान त्यांच्या पाया पडतात, पण मोदींच्या देशात लोकशाहीच्या मुसक्या आवळल्या आहेत, त्याचे काय? पापुआच्या पंतप्रधानांनी त्यांना चरणस्पर्श केला. खरं तर त्यांना साष्टांग दंडवतच घालायला हवे होते, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
पंतप्रधान मोदी हे जपानच्या हिरोशिमा येथे ‘क्वॉड’ परिषदेसाठी पोहोचले आहेत. त्या ‘क्वॉड’ परिषदेत त्यांनी संकेत दिले की, ”चीनच्या मुसक्या आवळणार!”, पण चीनच्या मुसक्या आवळणार, असा दम त्यांनी दिल्लीतून कधीच दिल्याचे कुणाला स्मरत नाही. चीनच्या मुसक्या आवळाल तेव्हा आवळाल, पण देशात लोकशाही, संविधानाच्या मुसक्या मोदी राज्यात आवळल्या जात आहेत, असं म्हणत सामनातून मोदींवर टीका करण्यात आली आहे.
लोकनियुक्त सरकारचे हे अधिकार आहेत व त्यात नायब राज्यपालांना हस्तक्षेप करता येणार नाही असे न्यायालयाने बजावले, पण लोकशाहीचा जय झाल्याचे मोदी सरकारला आवडले नाही व सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अमान्य करून सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीच्या काळात केंद्राने एक अध्यादेश काढून अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी एक राष्ट्रीय राजधानी प्राधिकरण स्थापन केले. अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश न जुमानण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली, असं म्हणत सामनातून सरकारच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे.
दिल्लीसारखे राज्य, देशाच्या राजधानीतील सत्ता केजरीवाल यांनी पंतप्रधानांच्या नाकासमोर जिंकली या अहंकारातून हा संघर्ष केंद्र सरकार करत आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल मनमानी करतात. शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रांत केजरीवाल सरकारने ‘जगमान्य’ काम केले. ते भाजपशासित एकाही राज्याला जमले नाही या पोटदुखीतून संबंधित खात्याचे काम पाहणारे सत्येंद्र जैन व मनीष सिसोदिया या दोन मंत्र्यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक करून तुरुंगात टाकले. या सुडाने केलेल्या कारवाया आहेत, असा घणाघात करण्यात आला आहे.