शरद पवारांनी काय केलं म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींना संजय राऊतांचा परखड सवाल, म्हणाले…
Saamana Editorial on PM Narendra Modi Statement About Sharad Pawar : शरद पवारांना प्रश्न विचारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना संजय राऊतांचा सवाल. पंतप्रधान असताना काय केले?, असं म्हणत संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल... यात शेतकरी आत्महत्येचा मुद्दाही मांडण्यात आला आहे.
मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. केंद्रात कृषीमंत्री असताना शरद पवार यांना शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल केला. या भाषणावेळी अजित पवार देखील मंचावर उपस्थित होते. नरेंद्र मोदींच्या या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. शरद पवारांना राजकीय गुरु मानणारे आता अचानक अशी भाषा कसे काय वापरतात?, असा सवाल राष्ट्रवादीकडून करण्यात आला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही असाच आक्रमक पवित्रा घेतला. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारण्यात आला आहे. ‘पंतप्रधान असताना काय केले?’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.
सामना अग्रलेख जसाच्या तसा
मोठ्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवली. मोदींच्या सरकारने ही कर्जे माफ केली, पण शेतकऱ्यांच्या पाच-दहा हजारांच्या कर्जासाठी त्यांच्या घरांवर टाच आली. भाजपास पैसे देणाऱ्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवून परदेशात पलायन केले.
हे मोदींच्या राज्यात घडत आहे. अनेक प्रतिष्ठत लोक, व्यापारी या देशात राहणे नको म्हणून वैतागून दुसऱ्या देशात पलायन करीत आहेत. हा देश राहण्यालायक ठेवला नाही. लोक भयग्रस्त आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरुणांना निराशेने ग्रासले आहे. पंतप्रधान असताना मोदींनी काय केले?
पंतप्रधान मोदी यांचे महाराष्ट्रात येणे-जाणे वाढले आहे. यात चुकीचे काहीच नाही. लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भाजपसाठी कमजोर राज्य आहे. त्यामुळे मोदींचे महाराष्ट्रावर जास्त लक्ष आहे. मोदी गुरुवारी शिर्डीत आले व नगर जिल्हय़ासह महाराष्ट्रातील 14 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची भूमिपूजने झाली. यावर श्री. प्रकाश आंबेडकर यांचे भाष्य अत्यंत मार्मिक आहे. ”गावच्या सरपंचाचा हट्ट असतो. गावातील प्रत्येक कामाचे उद्घाटन त्याच्याच हस्ते व्हावे. प्रत्येक कामाचे श्रेय त्यालाच मिळावे. मोदी हे त्या सरपंचाच्या भूमिकेत आहेत. त्याला कोणी काय करायचे?” श्री. प्रकाश आंबेडकरांचे हे म्हणणे खरेच आहे.
मोदी शिर्डीत आले व पुन्हा एकदा खोटे बोलून गेले. त्यांनी शरद पवार यांचे नाव घेतले नाही. पण त्यांनी सांगितले, ”महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर केवळ राजकारण केले. ते अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते, परंतु त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले?” असा प्रश्न मोदी यांनी केला. मोदी यांनी पवार यांच्याबाबत आपण आधी काय बोललो व आता काय बोललो हे तपासून घ्यायला हवे होते. खरं तर मोदी सरकारनेच शरद पवार यांना कृषी व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देशातला दुसऱया क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मविभूषण’ दिला व आता मोदी नेमके उलटे बोलत आहेत. गोंधळलेल्या मानसिकतेचे हे लक्षण आहे.
‘यूपीए’ सरकारच्या काळात पवार दहा वर्षे कृषिमंत्री होते. पंजाबराव देशमुखांनंतर लाभलेले पवार हे सर्वोत्तम कृषीमंत्री होते व त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी उत्तम योजना राबवल्या. त्यात आता पडायचे नाही, पण मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत जे देशाला दिले त्यांनी काय केले? त्यांना शेतीतले किती कळत होते? सध्याचे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना तर मोदी यांनी मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरवले. कृषिमंत्री पदाविषयी मोदी यांची ही आस्था आहे.