मुंबई | 08 ऑगस्ट 2023 : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर गुजरातच्या उच्च न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र हे प्रकरण संसदेत प्रलंबित आहे. याबाबत अद्याप निर्णय देण्यात आलेला नाही. यावर आजच्या सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. ‘सत्य जिंकले; पण संसदेच्या पायरीवर उभे’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख हिलिण्यात आला आहे.
मणिपूरपासून अविश्वास ठरावापर्यंत अनेक विषयांवर लोकसभेत चर्चा होईल. या चर्चेत राहुल गांधींना सहभागी होता येऊ नये यासाठीच सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा व सत्य संसदेच्या पायरीवर थांबवून ठेवले गेले आहे.
याच पायरीवर डोके ठेवून संसदेत प्रवेश करण्याचे नाटक श्री. मोदी यांनी नऊ वर्षांपूर्वी केले होते, पण मोदींचे राज्य संसदेत आल्यापासून न्याय, सत्य, विवेक व संविधान रोज पराभूत होत आहे. गुजरातच्या भूमीवरून सत्य, न्याय व नैतिकतेची गळचेपी सुरू असली तरी सर्वोच्च न्यायालयाने धृतराष्ट्राची भूमिका घेतलेली नाही. राहुल गांधींना मिळालेला न्याय हा सत्याचा विजय आहे. जिंकलेले सत्य संसदेच्या पायरीवर बेवारस अवस्थेत उभे करण्यात आले आहे इतकेच.
राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी आडनावावरून टिपणी केली. हा समस्त मोदी समाजाचा अपमान आहे म्हणून गुजरातचा एक भाजप पदाधिकारी पूर्णेश मोदी याने सुरतच्या न्यायालयात राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. सुरतचे न्यायालय गुजरातच्या भूमीवर असल्याने तेथे वेगळे काय घडणार?
एका आडनावावरील टिपणीवरून राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली गेली. ही शिक्षा ठोठावताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना लोकसभेतून तत्काळ अपात्र केले व सरकारने राहुल गांधी यांना दिल्लीतील राहत्या घरातून बेदखल केले. आता सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलेल्या शिक्षेस स्थगिती दिली. त्यास 72 तास उलटून गेले तरी लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांना पुन्हा लोकसभेचे सदस्यत्व बहाल केलेले नाही.
लोकसभा अध्यक्ष म्हणतात, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास सुरू आहे.” सत्य जिंकले आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी इतका विलंब का लागावा? या विषयात असे कोणते संशोधन करायचे आहे व अभ्यास करून कोणती पीएच.डी. पदवी मिळवायची आहे? सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्याबाबत दिलेला निर्णय हा नियम, कायद्याचा पूर्ण अभ्यास करूनच दिला आहे, पण या निर्णयाने आपल्या राज्यकर्त्याचे सुडाचे राजकारण उघडे पडले.
केंद्र सरकारने घाईघाईने राहुल गांधी यांना संसदेतून बाहेर काढले. कारण राहुल गांधी यांनी राफेल व अदानी प्रकरणांत प्रश्न विचारून सरकारला होते. राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ ही चार हजार किलोमीटरची पदयात्रा केली. या पदयात्रेने राहुल यांची लोकप्रियता वाढली व देशाचे नेते म्हणून त्यांना मान्यता मिळाली. राहुल गांधींवरील प्रत्येक हल्ला हा मोदी-शहांवरच उलटला.