मुंबई | 27 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची 17 ऑगस्टला बीडमध्ये सभा झाली. या सभेत मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक बबनराव गित्ते यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांच्या भाषणाची चर्चा झाली. शरद पवारांच्या याच सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज उत्तर देणार आहेत. बीडमध्ये आज ही उत्तर सभा होणार आहे. मात्र या सभेआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या उत्तरसभेला काहीही महत्व नाही. अजित पवारांची उत्तरसभा म्हणजे स्वत:वरचे अंत्यसंस्कार आणि उत्तरक्रिया आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. सनी देओल कर्ज ते फेडू शकले नाहीत. म्हणून त्यांच्या बंगल्यावर जप्तीची नोटीस आली. परंतु 24 तासात सूत्र हालली. दिल्लीतून आणि त्यांचा लिलाव थांबवला गेला. मग हाच न्याय नितीन देसाईंना का नाही?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
नितीन देसाई दिल्लीमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांना भेटले होते. त्यांचा स्टुडिओ वाचवला जावा यासाठी त्यांनी डोळ्यातून पाणी काढलं. माझं स्वप्न वाचवा, अशी त्यांनी विनंती केली. पण त्यांना वाचावलं गेलं नाही. दिल्लीतून परत येऊन त्यांनी आत्महत्या केली. सनी देओल यांच्याची आमचं वैयक्तिक वैर नाही, पण मग एक सनी देओलला एक न्याय. आणि नितीन देसाईंना वेगळा न्याय का? कारण सनी देओल हे भाजपचे खासदार आहेत. स्टार प्रचारक आहेत. आमच्या महाराष्ट्राच्या नितीन देसाईंना वेगळा न्याय का? तुम्ही नितीन देसाईला मरू दिलं. त्याच्या स्टुडिओचा लिलाव होऊ दिला, असे गंभीर आरोप संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरुतील इस्रोच्या मुख्यलयाला काल भेट दिली. यावेळी विक्रम लँडर उतरलेल्या ठिकाणाला शिवशक्ती म्हणून संबोधलं जाणार, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. यावर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.
ज्या ठिकाणी चांद्रयानाने तिरंगा फडकवला आहे. त्या जागेला वैज्ञानिक विक्रम साराभाई यांचं नाव दिलं पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरू आणि विक्रम साराभाई या दोन महान लोकांनी जे काम केलं आहे. त्यामुळे हे आपलं यान हे चंद्रावर गेलं आहे. पण तुम्ही वैज्ञानिकांना विसरता. प्रत्येक ठिकाणी हिंदुत्व घेऊन येता. परंतु काही गोष्टी असतात त्या विज्ञानाशी जोडलेल्या असतात, हे वीर सावरकरांचं म्हणणे आहे. त्यामुळे विज्ञानावर कुठल्या धर्माचे अतिक्रमण योग्य नाही, असं संजय राऊत म्हणालेत.