मुंबई | 27 सप्टेंबर 2023, गणेश थोरात : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासूनच बारामती मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. या मतदारसंघातून विधानसभेला आणि लोकसभेला कोण निवडणूक लढवणार? राष्ट्रवादी कुणाला उमेदवारी देणार? अजित पवार गट कुणाला उमेदवारी देणार? याची चर्चा रंगली. अशातच बारामतीत लोकसभेला नणंद विरूद्ध भावजय असा सामना होणार असल्याची चर्चा होतेय. यावर ठाकरे गटाचे नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. मला वाटत नाही, असा सामना बारामतीत होईल म्हणून… या सगळ्या अफवा सुरू आहेत. राजकारण आम्हाला सुद्धा कळतं. आम्ही सुद्धा राज्य केलं आहे आणि आम्हाला पवार कुटुंब सुद्धा माहित आहे. बारामतीचं राजकारण सुद्धा माहिती आहे. कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार, असं संजय राऊत म्हणालेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परदेश दौऱ्यावरही संजय राऊतांनी भाष्य केलंय. आदित्य ठाकरे यांच्यामुळेच हा दौरा रद्द झाला. दुष्काळजन्य परिस्थिती आहे. हे आधी कळलं नव्हतं का तुम्हाला? मुख्यमंत्री अचानक घाईघाईने परदेश दौऱ्यावर निघाले होते. कुठे चालले होते माहित नाही. महाराष्ट्रात ते गुंतवणूक आणणार होते. महाराष्ट्रातली गुंतवणूक बाजूच्या राज्यात गेली आहे. ती आधी इथे आणा. मुंबईला पुन्हा ते वैभव मिळवून द्या. तुम्ही तिकडे जाऊन काय मिळणार? उलट सरकारी पैशाचा अपव्यय होणार. नागपूर बुडालं. महाराष्ट्रात दुष्काळ आहे. हे तुम्हाला आदित्य ठाकरे यांच्यानंतर कळालं का?, असा घणाघाती सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
महाराष्ट्र जेव्हा दुष्काळात बुडाला होता. तेव्हा तुम्ही तुमच्या सरकारी निवासस्थानी काय करत होतात? सिने कलाकारांसोबत उत्सव साजरे करत होतात. दुःखद प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कुठे असावं याचा नैतिक भान असायला हवं. कलाकार येतात आणि जातात तिथे दुसरा मुख्यमंत्री असतील तर ते तिकडे येऊन नाचतील. महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणून जनतेचे दुःख हरण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री या नात्यांनी तुमच्याकडे असल्यामुळे तुम्हाला नागपूरमध्ये जाऊन लोकांचं दुःख जाणून घ्यायला हवं, संजय राऊत म्हणालेत.
महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की संबंधित खात्याचे मंत्री मुंबईत येऊन गेले. या राज्याला कृषिमंत्री अर्थमंत्री मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं? शंभर कोटीच्यावर कांदा पडून आहे. कांदा व्यापारी अस्वस्थ आहे .शेतकरी अस्वस्थ आहे. तुमचे मंत्री आले आणि गेले त्यांनी दिल्लीत बोलावलं प्रश्न महाराष्ट्रात मंत्री आले आणि काय म्हणाले दिल्लीत या…, असं म्हणत संजय राऊत यांनी कांदा प्रश्नावर भाष्य केलंय.