मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केलाय. एकनाथ शिंदे हे लाचार, लोचट आणि गुडघे टेकणारे मुख्यमंत्री आहेत. उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईचा अपमान पाहण्यापेक्षा, थोडा जरी स्वाभिमान असेल तर राजीनामा द्या, असं संजय राऊत म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. सोबत येण्यासाठी भाजपकडून दबाव आणला गेला. पण आम्ही गद्दार नाही. शिवसेनेशी प्रतारणा करणार नाही, असं संजय राऊत म्हणालेत. मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीवरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी राहू नये आणि राजधानी असली तरी मुंबईवर महाराष्ट्राचं नियंत्रण राहू नये यासाठी अनेक वर्ष किमान दहा वर्ष हे मोदी यांच्या सरकार प्रयत्न करत आहे. त्यांनी सुरुवातीला मुंबई कमजोर केली. मुंबईतील व्यवसायांची आंतरराष्ट्रीय कार्यालय हे गुजरातमध्ये खेचून नेली. मुंबईच्या आर्थिक नाड्या आवळल्या. शेवटी मुंबईचा विकास आता महाराष्ट्र सरकार करणार नाही.त्यासाठी निवडणुका होऊ दिल्या जात नाही. मुंबईची सर्व सूत्र हे ठरल्याप्रमाणे मोदींच्या या सरकारने उद्योगपती धनिकांच्या सरकारने दिल्लीकडे घेतली आणि आता त्यांचा खरा चेहरा उघड झाला, असं संजय राऊत म्हणालेत.
आज अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. मुंबई गिळण्याचा हा अत्यंत भयंकर असा डाव आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांचा सरकार पाडलं गेलं. त्याचसाठी शिवसेना पक्ष फोडला गेला. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडली. आताच्या केंद्र सरकारला मुंबईवर ताबा हवा आहे. मुंबई गिळायची आहे. मुंबई विकायची आहे. मुंबई लुटायची आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.
संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी आपल्याला 100 कोटी रूपयांची ऑफर आल्याचं म्हटलं. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. तुरुंगात जायचं नसेल तर अमुक अमुक गटाकडे जा. आम्हाला देखील दिल्लीतून फोन आले होते. आमच्यासह अनेकांना दबाव आले आम्ही फुटणार नाही. आम्हालाही दिल्लीतून अनेक फोन आले. आम्हाला देखील दबाव टाकण्यात आला. पण आम्ही आमची निष्ठा विकली नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
शिवसेनेला विकणं म्हणजे स्वतःच्या आईला विकणं होय. ममत्वाला विकून यांनी स्वतःची आई विकली. 2024 झाली यांना पश्चाताप होईल, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदेगटावर टीका केली आहे.
आम्ही अनेक महिन्यांपासून इंडिया आघाडीच्या बैठकीची तयारी करत आहोत. शिवसेनेकडे यजमान पद असलं तरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे जातीने यात लक्ष घालत आहेत. पारंपारिक पद्धतीने इंडियाच्या आघाडीच्या नेत्यांचं स्वागत केलं जाईल. मी खात्रीने सांगतो 2024 पर्यंत हुकूमशाहीचा आणि भाजपचा पराभव झालेला असेल, असं संजय राऊत म्हणाले.