साधे-गरीब-फाटके लोक न्याय हक्कांसाठी लढतायेत, 50 खोक्यांच्या सरकार पुढे झुकणार नाहीत- संजय राऊत
Sanjay Raut on Jalna Lathi Charge Manoj Jarange Uposhan : मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर संजय राऊत यांचं भाष्य; म्हणाले, ते झुकणार नाहीत. अजित पवार यांच्या टीकेलाही संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. काय म्हणालेत? पाहा...
मुंबई | 05 सप्टेंबर 2023 : जालन्यामध्ये एका लहानशा खेड्यामध्ये जरंगे पाटील उपोषणाला बसतो. त्याच्या पुढे इतकी आमिषं, इतका दबाव येऊन देखील तो झुकत नाही. याचं कौतुक आहे. महाराष्ट्राला सरकारने दिलेली वचन किती पोकळ आणि फसवी होती. काल एक आमदार गेले होते. जामनेरचे एक मंत्री गेले होते. काय झालं आंदोलन संपलं का? उपोषण करताना त्यांचा आंदोलन मागे घेतलं का?, 50 खोक्यांनी विकले जाणारी ही माणसं नाहीत. साधी गरीब फाटकी माणसं आहेत. ती न्यायासाठी लढा देत आहेत. ती तुमच्यासोबत 50 खोक्यांसमोर झुकणार नाहीत, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावर भाष्य केलं आहे.
जालन्यात आंदोलकांवर लाठीमार झाला. यात वरिष्ठांच्या आदेशाने सगळं झालं असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. आम्हा तिघांपैकी कुणीही लाठीमाराचे आदेश दिले नाहीत. तसं असेल तर आम्ही आदेश दिल्याचं सिद्ध करून दाखवा, असं चॅलेंज अजित पवार यांनी विरोधकांना दिलं. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजितदादा या आधी असे देखील म्हणाले होते की, मी भाजपसोबत जाणार नाही. देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले होते, राष्ट्रवादीसोबत सत्तेत जाणार नाही. सत्ता आल्यास अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग करतील, असंही म्हणाले होते. पण तसं झालं का? अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे निष्ठेच्या आणा-भाका घेऊन कशी बेईमानी करतात, हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. मराठा समाजाने यावेळी अत्यंत सावध पवित्रा घेतलेला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
हे लोक फक्त आश्वासन देतात. खोट्या घोषणा करतात. एका बाजूला चर्चा करतात. दुसऱ्या बाजूला पोलिसांना आंदोलकांची डोकी फोडायला सांगतात आणि अंगावरती आलं की हे लोक हात वर करतात. यांच्यावर विश्वास ठेवू नका, असंही राऊत म्हणाले.
हरीश साळवे काय करतात. हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु लंडनमध्ये त्यांनी जी पार्टी दिली. त्या पार्टीमध्ये ललित मोदी होता. मोहीम खान आला होता. ज्याला भारताच्या सेंट्रल एजन्सी शोधत आहेत. ललित मोदीला इथल्या सेंट्रल एजन्सीने फरार घोषित केलेला आहे. हरीश साळवी हे वन नेशन वन इलेक्शनचे मेंबर आहेत. नैतिकतेचा मुद्दा असेल तर त्यावर भाजपच्या प्रवक्त्यांनी बोललं पाहिजे. ज्यांना सीबीआय शोधत आहे ते तुमच्या हरीश साळवे यांच्यासोबत बसून चिअर्स करत आहेत, असं आव्हानही संजय राऊत यांनी दिलं आहे.