होय, BRS भाजपची बी टीमच! बावनकुळे KCR यांची वकीली का करतायेत?; संजय राऊत यांचा सवाल

| Updated on: Jun 28, 2023 | 11:13 AM

Sanjay Raut on KCR : निवडणुकांमध्ये मतविभाजनासाठी KCR यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री; संजय राऊत यांचा घणाघात

होय, BRS भाजपची बी टीमच! बावनकुळे KCR यांची वकीली का करतायेत?; संजय राऊत यांचा सवाल
Follow us on

मुंबई : BRS पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. परवा आणि काल BRS चे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांनी पंढरपूरमध्ये जात विठ्ठलाचं दर्शन घेतलं. तुळजाभवानीच्या चरणी ते नतमस्तक झाले. याच दौऱ्यात राष्ट्रवादीचे दिवंगत नेते भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांनी BRS मध्ये प्रवेश केला. यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. BRS पक्षाच्या राज्याच्या राजकारणातील एन्ट्रीवर आणि भाजपच्या भूमिकेवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

संजय राऊतांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र डागलंय. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची वकिली चंद्रशेखर बावनकुळे केव्हापासून करायला लागलेत. त्यांनी स्वत: च्या पक्षाकडे लक्ष द्यावं, असं संजय राऊत म्हणालेत.

चंद्रशेखर बावनकुळे आणि हे भाजपची सी टीम आहेत. त्यांच्या हातात काही नाहीये. सगळं काही दिल्लीतून ठरवलं जातं. महाराष्ट्र भाजपची कमान ना देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात आहे. सगळं काही दिल्लीतील नेते ठरवतात. त्यानुसारच पुढे सगळं काही घडतं, असं संजय राऊत म्हणालेत.

भाजप महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बी टीम सी टीम बनवत आहेत. 2019 ला एमआयएमला तयार केलं अन् आता 2024 साठी बीआरएसला तयार केलं जात आहे. कधी मनसेला बी टीम बनवतात तर कधी कुणाला… आणि म्हणतात, रात गयी बात गयी… आताही केसीआर यांना बोलावलं आहे. पण महाविकास आघाडी सगळ्या प्रकारच्या लढाईसाठी तयार आहे. ही लढाई मविआ जिंकणारच, असं संजय राऊत म्हणालेत.

केसीआर यांनी तेलंगणातील लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यावेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं हित पाहण्यासाठी इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांना इथं येण्याची गरज नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी केसीआर यांना खडसावलं आहे.

तेलंगणाच्या शेजारचं राज्य असणाऱ्या आंध्रप्रदेशमध्ये देखील BRS पक्ष नाही. पण ते महाराष्ट्रात येतात. याचं कारण भाजपने तुम्हाला सुपारी दिली आहे. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्रास देण्यासाठी BRS ला राज्यात बोलावण्यात आलं आहे, असं संजय राऊत म्हणाले