मुंबई | 13 ऑगस्ट 2023 : देशातील सार्वत्रिक अवघ्या काही महिन्यांवर आहेत. अशात आता विजयावर दावा केला जातोय. NDA आणि INDIA आघाडीकडून दावा करण्यात येतोय.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संसदेत बोलताना बहुमतामे आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असं म्हटलं. त्यानंतर आता संजय राऊत यांनी आज बोलताना मोठा दावा केला आहे. वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी निवडून येणार नाहीत, असं राऊत म्हणालेत. तर मोदींचा पराभव होईल आणि काँग्रेसचा तगडा चेहरा निवडून येईल, असं संजय राऊत म्हणालेत.
मी दिल्लीत आहे. त्यामुळे मला माहित आहे की वाराणसीमधून नरेंद्र मोदी जिंकून येऊ शकत नाहीत. राहुल गांधी यांच्या बाजूने लोकांचं मत आहे. वाराणसी मतदारसंघातून प्रियांका गांधी निवडून येतील. नरेंद्र मोदी नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
31 ऑगस्ट 1 सप्टेंबरला मुंबईत इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. यावरही संजय राऊत बोललेत. इंडिया बैठकीसाठी देशातील महत्वाचे नेते येणार आहेत. आम्हीच त्यांना बोलावले आहे. अनेक पक्ष येणार आहेत आणि ग्रँड हयात हॉटेलमध्ये सर्व कार्यक्रम असणार आहेत, असंही राऊत म्हणालेत.
आजच्या सामनाच्या ‘रोखठोक’ या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मी जे काही लिहिलं ते नवीन नाही. गौप्यस्फोट नाही. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सदनात सांगितलं की 2014 साली युती तुटली.एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं की 2014 साली नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सूचनप्रमाणे युती तोडली. त्यांना स्वबळावर जिंकून यायचं होतं, असं संजय राऊत म्हणाले.
2019 साली पुन्हा त्यांनी युती तोडली. हॉटेल ब्यूसीमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी 50 50 चा फॉर्म्युला जाहीर केला. 2019 ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते, पण भाजपने ते मान्य केले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होणार होते कारण विधिमंडळ नेते होते, पण भाजपने युती तोडली. नरेंद्र मोदी यांनी खरं बोलावं इतकं खोटं बोलू नये.महाराष्ट्रातील लोकांना सर्व माहीत आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं.
मुख्यमंत्री सध्या त्यांच्या दरे या गावी आहेत. तब्येत ठीक नसल्याने तिथे सध्या ते विश्रांती घेत आहेत. त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावं. ते कर्तबगार वगैरे आहेत. मुख्यमंत्री तिकडे आराम करत आहेत, त्यांची तब्येत बिघडली असं कळतंय. काम करायला मुख्यमंत्री झाले की आराम करायला? त्यांनी यावर तोंड उघडलं पाहिजे, यावर बोलायला पाहिजे. केंद्राकडून अशी वागणूक मिळत आहे. त्यांच्या मानेवर गुलामगिरीचा पट्टा बांधला आहे तो आधी त्यांनी काढावा, असं संजय राऊत म्हणाले.