मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कालच्या भाषणावर टिपण्णी केली आहे. यावेळी राऊतांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचीही आठवण काढली. पंकजा मुंडेनी त्यांची व्यथा बोलून दाखवली. ज्यांनी भाजप शून्यातून निर्माण केला, त्याचं आज अस्तित्त्व काय उरलंय? पंकजा मुंडेचा पराभव का झाला हे आम्ही वेगळं सांगायची गरज नाही, असं संजय राऊत म्हणाले.
आज गोपीनाथराव मुंडे असते, तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. त्यामुळे राजकीय कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी परिणामांचा विचार न करता निर्णय घ्यायला हवा. तरच त्यांचं अस्तित्त्व टिकून राहील, असं म्हणत संजय राऊत यांनी खंत बोलून दाखवली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची काल जयंती होती. त्यानिमित्त दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून काल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील हजेर होते. या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.
भाजप माझा थोडी आहे. मी भाजपात आहे. भाजप पक्ष मोठा आहे. मुंडे साहेब होते तेव्हा छोट्या-छोट्या माणसांना घेऊन बनवलं. तेव्हा पक्षाने सत्तेचं तोंड पाहिलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांच्या कालच्या भाषणावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजधानी दिल्लीत मागच्या महिनाभराहून अधिक काळ कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारलं आहे. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुस्तीगीरांच्या आंदोलनाबाबत केंद्र सरकारनं भूमिका घेतली पाहिजे. त्यांना न्याय नाकारून चालणार नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा हा सारा देश ऋणी आहे. त्यांचं नाव गाजलेलं आहे. उत्तम शासनकर्त्या त्या होत्या. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील पुतळे हटवल्यानंतर सरकारला नामांतराचं सुचलं आहे. पण या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याला जर नाव मिळत आहे. तर विरोध करायचं काही कारण नाही. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात घडलेल्या घटनेनंतर राज्य सरकारला ही उपरती झालीय, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
12 जूनला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशांतील सर्व भाजपविरोधी पक्षांना एकत्र पाटण्याला बोलावलं आहे. तिथे बैठक होणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरेदेखील जाणार आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.